‘छोटे देश’ आता जगावर राज्य करू शकत नसल्याचे विधान – चिनी दूतावासाकडून इशारा
वृत्तसंस्था / लंडन
इंग्लंडच्या कॉर्नवाल येथे पार पडलेल्या तीन दिवसीय जी-7 परिषदेमुळे चीन बिथरला आहे. या परिषदेकडे चीन स्वतःच्या विरोधातील गटबाजीच्या स्वरुपात पाहत आहे. निवडक देशांनी जगाच्या भविष्याचा निर्णय घेण्याचा काळ केव्हाच उलटला असल्याचे चीनने जी-7 देशांना इशारा देत म्हटले आहे. देशांच्या छोटय़ा समुहांनी जागतिक निर्णय घेण्याचा काळ आता राहिला नसल्याचे लंडन येथील चिनी दूतावासाच्या प्रवक्त्याने नमूद केले आहे.
देश छोटा असो किंवा मोठा, मजबूत असो किंवा दुर्बल, गरीब असो किंवा श्रीमंत सर्व समान असल्याचे आम्ही मानत आलो आहोत. जगाशी संबंधित मुद्दय़ांवर सर्व देशांशी सल्लामसलत केल्यावरच निर्णय घेतले जावेत असेही चीनने म्हटले आहे. जी-7 देश म्हणजेच ब्रिटन, जर्मनी, इटली, फ्रान्स, जपान, अमेरिका आणि कॅनडा यांनी चीनच्या ‘वन बेल्ट, वन रोड’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या विरोधात नवा प्रकल्प जाहीर केला आहे.
मॅक्रॉन यांच्या विधानामुळे वाद
परिषदेत फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी कथितरित्या उत्तर आयर्लंड ब्रिटनचा हिस्सा नसल्याचे म्हटले आहे. यावरून ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन भडकले असून त्यांनी हा आमचा अंतर्गत विषय असल्याचे सुनावले आहे. उत्तर आयर्लंडवर फ्रान्सच्या अध्यक्षांची टिप्पणी ‘अपमानास्पद’ असल्याचे विदेशमंत्री डोमिनक राब यांनी म्हटले आहे.
बायडेन यांच्याकडून चीन लक्ष्य
तीन दिवस चाललेल्या परिषदेत चीनचा मुद्दा प्रभावी ठरला आहे. चीनच्या विरोधात अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्यासह सर्व नेत्यांची कठोर भूमिका दिसून आली आहे. परिषद समाप्त झाल्यावर बायडेन यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. चीनने वुहान लॅबचा ऍक्सेस द्यावा, यामुळे योग्य प्रकारे कोरोनाच्या उत्पत्तिचा तपास करता येणार असल्याचे बायडेन यांनी म्हटले आहे.