कराड पोलिसांनी लावला खुनाचा छडा, जिल्हा पोलीस प्रमुखांकडून पोलिसांचे कौतुक
प्रतिनिधी/कराड
जुगारात पैसे हरल्याचा राग मनात धरून मजूर कामगार मित्राचा चाकूने वार करून निर्घृण खून केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. गोळेश्वर (ता. कराड) येथे उसाच्या शेतात आढळलेल्या मृताच्या खुनाचा कराड पोलिसांनी उलगडा करत संशयितास जेरबंद केले. इस्माईल शताबुद्धीन शेख (वय 25, मूळ रा. बालुग्राम, ता. राधानगरी, जि.साहबगंज, राज्य-झारखंड) असे खून झालेल्याचे नाव आहे. मोहम्मद सेटु आलम हिजाबुल शेख (वय 23 वर्षे, रा. इर्शादटोला, ता. राजमहल, जि. साहेबगंज, राज्य झारखंड) असे खूनप्रकरणी अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
कोणतेही धागेदोरे नसताना खुनाचा गुन्हा उघड केलेल्या कराड पोलिसांचे जिल्हा पोलीसप्रमुख अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी कराड येथे कौतुक केले.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, इस्माईल शताबुद्धीन शेख हा झारखंडवरून काही ओळखीच्या कामगारांसोबत कराडला मजुरीसाठी आला होता. कराड येथेच काही कामगार मित्रांसमवेत तो राहात होता. 6 जुलै 2021 रोजी सकाळी कामाला जातो, असे सांगून तो बाहेर पडला. मात्र त्यानंतर तो परत आला नाही. त्याच्यासमवेत काम करत असलेल्या कामगारांनी हा प्रकार इस्माईलचा भाऊ मतीऊर रहिमान शेताबुद्दीन शेख याला झारखंड येथे कळवला. मतीऊर याने कराड येथे असलेल्या त्यांचा चुलतभाऊ राकीब शेख याला इस्माईलचा शोध घेण्यास सांगितले. तीन ते चार दिवस शोध घेऊनही इस्माईल न सापडल्याने 10 जुलै 2021 रोजी कराड शहर पोलीस ठाण्यात इस्माईल बेपत्ता झाल्याची खबर देण्यात आली. यावरून पोलिसांनी इस्माईलचा शोध सुरू केला.
गोळेश्वर येथे सडलेला मृतदेह आढळला
दरम्यान, 13 जुलै 2021 रोजी गोळेश्वर येथे नदीकाठावरील उसाच्या शेतात पाचोळ्यात सडलेल्या अवस्थेत एक अनोळखी पुरुषाचा मृतदेह मिळून आला. याबाबत कराड शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद झाली. या अकस्मात मयतचा तपास करताना पोलिसांनी इस्माईलच्या भावासह इतरांना मृतदेह दाखवला. तो मृतदेह इस्माईल शताबुद्धीन शेख याचाच असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणाचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. मृतदेह पूर्णतः कुजलेला असल्याने शवविच्छेदन करता आले नाही. त्यामुळे नेमका अंदाज बांधणे कठीण होते. कुटुंबाची तक्रार नसताना पोलिसांनी या गुन्हय़ाची उकल केली.
तुटलेल्या चांदीच्या चेनवरून तपासाची दिशा
पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत पाटील यांनी तपासाच्या सूचना दिल्या. दरम्यान, जिथे मृतदेह आढळला तिथे घटनास्थळी एक तुटलेल्या चांदीची चेन आढळली होती. ही चेन मृताची नसल्याचे निष्पन्न झाले. तुटलेल्या चेनवरून तपास सुरू झाला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या सूचनेनुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे विजय गोडसे, पोलीस उपनिरीक्षक अर्जुन चोरगे, नाईक एम. एम. खान, संदीप पाटील या पथकाने या गुह्यातील काही धागेदोरे लावत झारखंड येथे जाऊन चौकशी सुरू केली.
जुगारात हरल्यानेच काटा काढला इस्माईलशी संबंधित काही लोकांकडे जे कराडला होते, त्यांच्याकडे चौकशीचे सत्र सुरू केले. त्यातील काहींना कराडला बोलवले. चौकशीसाठी आलेल्या मोहम्मद सेटु आलम हिजाबुल शेख याने जुगारात हरलेल्या पैशाचा राग मनात धरून इस्माईल शेख यास 7 जुलै रोजी कामाला चल म्हणून गोळेश्वर येथे घेऊन गेल्याचे समोर आले. त्याला नदीकाठावरील उसाचे शेतात नेऊन त्याच्यावर चाकुने वार करून निर्घृण खून केला. इस्माईलकडील 9 हजार 500 रुपये काढून घेऊन हल्लेखोराने पलायन केले. त्याचदिवशी संशयित हल्लेखोर झारखंड येथे पळून गेला. गुह्यातील संशयित व मृत हे एकत्रच मजुरीचे काम करत होते. ते झारखंड येथील जवळ जवळच्या गावातील राहणारे होते. पोलिसांनी संशयिताची खात्री पटताच त्याला 1 ऑगस्ट रोजी ताब्यात घेऊन चौकशी करत अटक केली. गुह्याचा पुढील तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे विजय गोडसे करत आहेत. या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख विजय गोडसे, पोलीस उपनिरीक्षक अर्जून चोरगे, हवालदार एम एम खान, संदीप पाटील, जयसिंग राजगे, नितीन येळवे, पोलीस नाईक संजय जाधव, मारुती लाटणे, प्रफुल्ल गाडे, शंकर गडांकुश यांनी सहभाग घेतला