प्रतिनिधी/ बेळगाव
जुना महात्मा फुले रोडच्या रस्त्याचा विकास करण्यात येत आहे. याकरिता गटारीचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. मात्र नविन महात्मा फुले रोडजवळ गटारीची जागा बदलण्यात आली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी गटार बांधकामाला आक्षेप घेतला असून, जुन्या गटारीच्या ठिकाणी नवीन गटार बांधण्यात यावी अशी मागणी करीत बांधकाम थांबविले.
डाकबंगला ते नविन महात्मा फुले रोडला जोडणाऱया जुन्या महात्मा फुले रोडचे काम सुरू करण्यात आले आहे. पण रस्त्याच्या रूंदीवरून वाद निर्माण झाला होता. अखेर यावर तोडगा काढून सदर रस्त्याच्या दुतर्फा गटार बांधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पण नविन महात्मा फुले रोड लगत गटारीची जागा बदलण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. जुन्या गटारी येथील इमारती लगत बांधण्यात आल्या आहेत. मात्र नव्याने बांधण्यात येणारी गटार रस्त्याच्या मधोमध बांधण्यासाठी खोदाई करण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक रहिवाशांनी गटार बांधकामाला आक्षेप घेतला असून, जुन्या गटारीच्या ठिकाणीच नविन गटार बांधण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. सदर गटारीचे बांधकाम थांबविण्याची विनंती महापालिकेच्या उपविभाग 2 च्या सहाय्यक कार्यकारी अभियंत्यांकडे करण्यात आली होती. पण याची दखल अभियंत्यांनी घेतली नाही. त्यामुळे याबाबत अधिक्षक अभियंत्यांकडे लेखी तक्रार देऊन गटारीचे बांधकाम थांबविण्याची मागणी केली आहे. याठिकाणी जुना महात्मा फुले रोड नविन रस्त्याला मिळत असल्याने या ठिकाणी वाहनांची गर्दी होते. याठिकाणी निर्माण होणाऱया वाहतुक कोंडी समस्येवर निवारण करण्याच्या दृष्टीने जुन्या ठिकाणीच गटारीचे बांधकाम करण्यात यावे अशी विनंती करण्यात आली आहे. परिसरातील रहिवाशांच्या सहय़ानिशी सहाय्यक कार्यकारी अभियंत्यांकडे निवेदन देण्यात आले आहे.