महापालिका व्याप्तीत 42 हजारहून अधिक पथदीप तर दोनशे हायमास्ट : देखभालीकरिता अडीच कोटींहून अधिक निधी खर्च तरीदेखील पथदीप बंदच
प्रतिनिधी / बेळगाव
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरातील प्रत्येक रस्त्याशेजारी डेकोरेटिव्ह पथदीप बसविण्यात येत आहेत. हे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यापूर्वी बसविण्यात आलेले डेकोरेटिव्ह पथदीप बंद असल्याने शोभेचे बनले आहेत. अशातच आता नव्याने पथदीप बसविण्यात येत आहेत. त्यामुळे डेकोरेटिव्ह पथदीप सुरू ठेवणार की स्मार्ट सिटीच्या दिमतीला केवळ उभारण्यात येणार, असा प्रश्न शहरवासीय करीत आहेत.
महापालिकेने शहर आणि उपनगरांतील प्रत्येक विद्युत खांबावर पथदीप बसविले होते. महापालिका व्याप्तीमध्ये 42 हजारहून अधिक पथदीप आणि दोनशे हायमास्ट बसविण्यात आले आहेत. शहरातील रस्त्यांचे रुंदीकरण करताना काही रस्त्यांशेजारी डेकोरेटिव्ह पथदीप बसविण्यात आले आहेत. मात्र, डेकोरेटिव्ह पथदिपांसह जुने पथदीप बंद असल्याने शहरात अंधार पसरलेला आहे. पथदिपांबाबत तक्रार करण्यासाठी आणि महापालिकेच्या माहितीकरिता पथदिपांच्या खांबांवर क्रमांक घालण्यात आले होते. त्यामुळे क्रमांकाच्या आधारे तक्रार केल्यानंतर दुरुस्तीचे काम करण्यात येत होते. मात्र, महापालिकेने पथदिपांकरिता वेगळी विद्युत वाहिनी घालून चांगली सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, सदर प्रयत्न वाया गेला असून वारंवार विद्युत वाहिन्या खराब होण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे शहर आणि उपनगरांतील सर्रास पथदीप बंद राहत आहेत. सध्या शहरातील प्रत्येक रस्त्यांवर डेकोरेटिव्ह पथदीप बसविण्यात आले आहेत. शहर आणि उपनगरांतील पथदिपांच्या दुरुस्तीसाठी आणि देखभालीकरिता अडीच कोटींहून अधिक निधी वर्षभरात खर्च करण्यात येतो. तरीदेखील पथदीप बंदच असतात.
काँग्रेस रोडची दुरुस्ती करून काही वर्षापूर्वी फुटपाथ निर्माण केलेल्या ठिकाणी शोभेचे फुटपाथ लाईट बसविण्यात आले होते. तसेच बसवेश्वर चौक गोवावेस, खानापूर रोड आणि जिल्हा रुग्णालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग आणि आरपीडी रोड अशा विविध रस्त्यांशेजारी फुटपाथ डेकोरेटिव्ह लाईट बसविण्यात आले होते. याकरिता लाखो रुपयांचा निधी खर्ची घालण्यात आला होता. मात्र, सदर पथदीप काही महिने सुरू राहिले, त्यानंतर त्यांची देखभाल करण्यात आली नसल्याने ते बंद पडले. त्या दिव्यांची दुरुस्ती कधी झालीच नाही. सदर दिवे अखेर भंगारात गेले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या निधीचा चुराडा आणि गैरवापर झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
महापालिकेची योजना यशस्वी होणार का?
आता स्मार्ट सिटीच्या नावाखाली शहरात डेकोरेटिव्ह पथदीप व फुटपाथवरील दिवे बसविण्याचा सपाटा सुरू आहे. पथदिपांची देखभाल व विजेच्या बिलापोटी मोठय़ा प्रमाणात खर्च होत असल्याने एलईडी दिवे बसविण्याची मोहीम हाती घेतली आहे. आगामी आठ वर्षांच्या कालावधीकरिता देखभालीचे कंत्राट दिले आहे. याकरिता 70 कोटी खर्च करण्यात येणार असून हे काम युद्धपातळीवर सुरू आहे. बाजारपेठेतील रस्त्यांवर पथदीप बसविण्यात येत आहेत. पण यापूर्वीचे पथदीप व डेकोरेटिव्ह लाईट बंद असल्याने मनपाची योजना यशस्वी होणार का, असा मुद्दा उपस्थित होत आहे.
सध्या शहराचा निम्मा भाग अंधारात
शहरातील पथदिपांच्या देखभालीचे कंत्राट देण्यात येते. पण पथदिपांच्या दुरुस्तीसाठी तक्रार केल्यानंतर महापालिका आणि कंत्राटदारांकडून कोणतीच दखल घेण्यात येत नाही. त्यामुळे सध्या शहराचा निम्मा भाग अंधारात आहे. प्रमुख मार्गांवरील पथदीप वर्षापासून बंद आहेत. सध्या असलेले डेकोरेटिव्ह पथदीप केवळ शोभेचे बनले असून आता नव्याने बसविण्यात येणाऱया पथदिपांची यामध्ये भर पडणार का? अशी विचारणा नागरिक करीत आहेत.