लोकमान्य रंगमंदिर येथे आयोजित युफोरिया कार्यक्रमाला संगीत रसिकांची गर्दी : जुन्या पिढी सोबतच नव्या दमाच्या संगीत प्रेमींचा उत्तम प्रतिसाद
प्रतिनिधी / बेळगाव
हिंदी चित्रपटसृष्टीत संगीत क्षेत्रात अजरामर ठरलेली गीते ऐकताना एक नाव सतत कानावर पडत असते ते म्हणजे आर. डी. बर्मन. त्यांनी संगीत दिलेली गाणी 50-60 वर्षानंतरही तितकीच लोकप्रिय आहेत, हे रविवारी लोकमान्य रंगमंदिर येथे आयोजित युफोरिया या कार्यक्रमातून पुन्हा एकदा जाणवून आले. त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी आजही लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. या गीतांना जुन्या पिढी सोबतच नव्या दमाच्या संगीत प्रेमींनी उत्तम प्रतिसाद दिल्याचे या कार्यक्रमातून दिसून आले.
बेळगावचे संगीत रसिक मोहन रायकर यांनी आयोजित केलेला युफोरिया ऑर्केस्ट्रा रविवारी लोकमान्य रंगमंदिर येथे पार पडला. लोकमान्य को-ऑप. सोसायटी प्रायोजित या कार्यक्रमाला संगीत रसिकांची तुडुंब गर्दी झाली होती. एकाहून एक सरस जुन्या गीतांसोबतच नवीन गीते सादर करून रसिकांची मने कलाकारांनी जिंकली.
अजरामर गीतांनी कार्यक्रमात रंगत
कार्यक्रमाची सुरुवात ‘ओ माझी रे’ या बहारदार गीताने झाली. त्यानंतर ‘ना तुम बेवफा हो’, याचसोबत नव्या दमाची ‘बे बो मे बे बो’, ‘चली रे, कच्चे धागे, बाजीगर अशी गाणी सादर करण्यात आली. ‘चला जाता हू’ या अजरामर गीताने कार्यक्रमात रंगत आणली. हे गाणे रसिकांनी पुन्हा पुन्हा गाण्याची विनंती केली. आर. डी. बर्मन यांच्या सोबतच अन्नू मलीक, ए. आर. रेहमान या गीतकारांची गाणीही सादर करण्यात आली.
कलाकारांची सुरेल साथ
स्नेहल जाधव, धृती वेर्णेकर, रोहन वेर्णेकर, तुषार रेवणकर, ओमकार रेवणकर, शिवराज पाटील यांनी संगीत साथ दिली. डॉ. अरुण देसाई, वसंत पाटील, सागर चंदगडकर, बापू, श्रीया रेवणकर, काजल घोटगाळकर, स्वाती सुतार यांनी सुरेख गीते सादर केली. राजेश पटनाईक यांनी आपल्या खुबीने निवेदन करत कार्यक्रमात रंगत आणली. यावेळी मोठय़ा संख्येने संगीत रसिक उपस्थित होते.