बेळगाव / प्रतिनिधी
शहरात सुरू असलेल्या विकासकामांमुळे काही रस्ते वाहतुकीला बंद तर काही रस्त्यांवर एकेरी वाहतूक सुरू असल्याने शहरातील वाहतूक व्यवस्थेचे तीन-तेरा वाजले आहेत. जुन्या भाजी मार्केटजवळील चौकात काँक्रिटीकरणाचे काम हाती घेण्यात आल्याने या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. दरम्यान, चौकात सीडीवर्कचे काम सुरू असल्याने वाहनांना ये-जा करणे अडचणीचे बनले आहे.
शहरातील अनेक रस्त्यांवर काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. दरम्यान, रस्त्यांच्या चौकात सीडीवर्कची कामेही हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळे रस्त्यावरच माती, दगड व इतर रस्ता बांधकामासंबंधी साहित्य पडून असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत होणारी रस्त्यांची कामे अत्यंत संथगतीने सुरू असल्याने याचा फटका नागरिकांना बसत आहे.
जुन्या पी. बी. रोडवर मध्यवर्ती बसस्थानकात येण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे. त्यामुळे या रस्त्यावर वाहतुकीचा ताण वाढला आहे. परिणामी वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. त्यातच या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न आणखी जटील बनला आहे.