विक्री होताच मालकाचे नाव नोंदीतून हटणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने जुन्या वाहनांच्या विक्रीसंबंधी नियमांमध्ये बदल केले आहेत. नव्या नियमामुळे जुने वाहन विकणाऱया कंपन्या आणि वितरकांसह वाहनविक्री करणाऱया सर्वसामान्यांनाही लाभ होणार आहे. जुन्या वाहनांच्या विक्रीसंबंधी नियमांमध्ये बदल करत सरकारने कार वितरक तसेच कंपन्यांची जबाबदारी निश्चित केली आहे. नव्या आदेशानंतर आरटीओकडून नोंदणीकृत डीलरच कारविक्री आणि खरेदीसाठी अधिकृत असणार आहे.
जुन्या वाहनांच्या बाजारात पारदर्शकता आणणे आणि सर्वसामान्य लोकांना फसवणुकीपासून वाचविण्यासाठी हे नवे नियम सादर करण्यात आले आहेत. हस्तंतरण विषयक अडथळे, थर्ड पार्टी संबंधित देयकाशी निगडित वाद, थकबाकीदार निश्चित करण्यातील अडचणी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने मोटर वाहन नियम, 1989 च्या अध्याय तीनमध्ये दुरुस्ती केली आहे. याच्या माध्यमातून जुन्या वाहनांच्या बाजारासाठी एक समग्र नियामक व्यवस्था तयार करण्याचा उद्देश आहे.
सद्यकाळात वाहन विक्री करताना कंपन्या किंवा कार वितरक वाहन हस्तांतरणासाठी केवळ रिकामी अर्जात स्वाक्षरी करवून घेतात. यानंतर कार कुणाला विकली जाते आणि विकली जात नाही तोवर तिचा वापर कोण कोण करतो हे वाहनमालकाला माहित नसते. परंतु नव्या नियमानुसार वाहनविक्रीनंतर वितरक किंवा कंपनीला ऑनलाइन स्वरुपात वाहन स्वतःच्या नावावर करवून घ्यावे लागणार आहे. म्हणजेच आता वाहन विकताच त्याच्या मूळ मालकाची कुठलीच जबाबदारी राहणार नाही.
प्रस्तावित नियमांमधील मुख्य तरतुदी
-वितरकांची सत्यता पडताळण्यासाठी नोंदणीकृत वाहन वितरकांसाठी प्रमाणीकरण लागू करण्यात आले आहे.
-नोंदणीकृत वाहन मालक अन् वितरकांमधील वाहनाच्या पुरवठय़ाच्या सुचनेसाठी प्रक्रियेचा खुलासा करण्यात आला.
-नोंदणीकृत वाहन स्वतःजवळ बाळगताना वितरकांचे अधिकार अन् जबाबदाऱयाही स्पष्ट करण्यात आल्या आहेत.
-ताब्यातील वाहनांचे नोंदणी प्रमाणपत्र/वाहन फिटनेस प्रमाणपत्राचे नुतनीकरण, एनओसी, मालकी हस्तांतरणासाठी वितरकांना अर्ज करता येणार.
-इलेक्ट्रॉनिक वाहनाच्या देखभालीसंबंधी ट्रिप रजिस्टर ठेवणे अनिवार्य, यात वाहनाच्या वापराचा पूर्ण तपशील द्यावा लागणार.
-नोंदणीकृत वाहन वितरक, मध्यस्थांची ओळख पटविण्यासाठी आणि त्यांना अधिकार देण्यासाठी हे नियम सहाय्यभूत ठरणार.