प्रतिनिधी/ बेळगाव
एकीकडे देशांतर्गत विमानसेवा अद्याप जोर धरत नसतानाही बेळगावमधील विमानसेवेला प्रवाशांकडून उत्तम प्रतिसाद दिला जात आहे. प्रत्येक महिन्यात प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून जुलै महिन्यात 14 हजार 500 प्रवाशांनी विमानप्रवास केला आहे. याची दखल विमान कंपन्यांनीही घेतली असून बंद असलेल्या शहरांना पुन्हा विमानसेवा देण्यात येत आहे.
25 एप्रिलपासून बंद असलेली विमानसेवा अखेर 25 मेपासून पुन्हा सुरू करण्यात आली. त्यावेळी प्रवासावर अनेक निर्बंध असतानाही बेळगावमधून विमानसेवा सुरू ठेवण्यात आली होती. त्याला प्रवाशांनी चांगला प्रतिसादही दिला होता. सध्या बेळगावमधून बेंगळूर, अहमदाबाद, पुणे, हैद्राबाद, इंदूर, अजमेर या शहरांना विमानसेवा सुरू आहे. सप्टेंबर महिन्यात उर्वरित शहरांना विमानसेवा सुरू करण्यासाठी विमान कंपन्या प्रयत्न करीत आहेत.
बेळगावमध्ये विमानतळावर सर्व त्या खबरदारी घेतल्या जात असल्यामुळे ग्राहकांची पहिली पसंती ही बेळगावला असते. त्यामुळेच मे महिन्यात 445 इतकी असणारी प्रवासी संख्या जुलै महिन्यात 14 हजार 500 पर्यंत पोहचली आहे. ऑगस्ट महिन्यात ही संख्या अजून वाढण्याची शक्मयता वर्तविण्यात येत आहे.