रू. 7 लाखाचा दारू साठा जप्त, एका संशयिताला अटक
प्रतिनिधी/ फोंडा
म्हार्दोळ-फोंडा येथील बगलरस्तावर समान क्रमांकाच्या जुळया नंबरप्लेटसह बेकायदेशीरित्या विना परवाना दारूची वाहतूक करणाऱया दोन ट्रक आढळल्याने मोठी खळबळ उडाली. याप्रकरणी फोंडा पोलिसांनी धडक कारवाई करताना जुळया नंबरप्लेटच्या ट्रकातून सुमारे रू. 7 लाख किमतीचा दारू साठा जप्त करण्यात आला असून संशयित असलम कासिम शेख (मुंबई) याला अटक करण्यात आली आहे. सदर घटना मंगळवार 10 नोव्हे. रोजी उघडकीस आली होती. याप्रकरणी काल गुरूवारी एका संशयिताला व दोन्ही आयचर ट्रक जप्त करण्यात आले आहे.
फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार म्हार्दोळ येथील पेट्रोलपंपजवळ एकाच नंबर प्लेटचे जीजे-31 टी 3878 दोन ट्रक काही अंतरावर पार्क करून ठेवण्यात आले होते. सदर प्रकारावर गस्तीवरील पोलिसांची नजरेत गेल्यानंतर कारवाईचे सुत्रे हलविण्यात आली. दोन्ही ट्रकामध्ये लाकडी पुट्टे भरण्यात आले होते. फोंडय़ातील एका ट्रान्सपोर्टरकडून सदर माल मुंबईमार्गे गुजरात येथे वाहतूकीसाठी उचलण्यात आला होता. संशयास्पद दोन्ही ट्रकाच्या कागदपत्राची पडताळणी फोंडा पोलिसांनी केली. त्यावेळी नंबर प्लेट असली-नकली असा घोळ निर्माण झाला. दोन्ही ट्रकाच्या चालक घटनास्थळावरून पळ काढल्याचे निदर्शनास आल्याने संशय बळावला.
बनावट नंबरप्लेट ट्रकात 2520 बाटल्याचा साठा
जुळय़ा नंबरप्लेटच्या ट्रकापैकी एकात 210 बॉक्स भरून दारूचा साठय़ाची वाहतूक करण्यात येत होती. एकूण 2520 विस्कीच्या बॉटल्याची तस्करी विनापरवाना गोव्याहून गुजरातकडे नेण्यात येत होती. चेकनाक्यावरील व गस्तीवरील पोलिसांना गुंगारा देण्यासाठी दारू साठय़ाच्यावरती लाकडी पुट्टे भरण्यात आले होते. तसेच कुणालाही संशय येऊ नये यासाठी त्याच क्रमांकाच्या एका ट्रकात फक्त लाकडी पुट्टे भरण्यात आले होते. मात्र त्याच क्रमांकाच्या बनावट नंबरप्लेटच्या ट्रकात हा अवैध दारूसाठा दडविण्यात आला होता. मात्र म्हार्दोळ पोलिस आऊट पोस्टच्या गस्तीवरील पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा भांडाफोड झाला. बनावट नंबरप्लेट करण्यता आलेला दुसरा ट्रक क्रमांक हा महाराष्ट्रात नोंदणीकृत असल्याचा संशय पोलिसांना व्यक्त केला आहे. मात्र फोंडा आरटीओ कार्यालयातून वाहनांचे सर्वेक्षण करण्यात आले असून अजूनपर्यंत अहवाल उपलब्ध झालेला नाही.
याप्रकरणी संशयिताविरोधात भा.दं.सं. 465, 468, 420(120),तसेच 5 व 8 गोवा अबकारी कायदा 1964 खाली दोन्ही ट्रकाच्या मालक, चालक व क्लिनर विरोधात गून्हा नोंदविण्यात आला आहे. तसेच पोलिसांच्या हाती लागलेल्या संशयिताला 8 दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
फोंडा पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी
फोंडा पोलिस स्थानकाचे निरीक्षक मोहन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नितेश काणकोणकर, सहाय्यक उपनिरीक्षक जितेंद्र गावडे, हवालदार केदारनाथ जल्मी, रोहिदास भोमकर, वंदेश सतरकर, कॉन्स्टेबल हनुमंत बोरकर, जयवंत भरतू, सिद्धेश गावस, राकेश गावकर, राजेश गावडे, मदन गावस, रविकांत सावंत व बाबनी गावस यांच्या टीमने ही धडक कारवाई केली. फोंडा पोलिसांच्या या कामगिरीमुळे येथील ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.
सदर प्रकार किती काळापासून सुरू होता असाही प्रश्न उपस्थित होत असून चेकपोस्ट व गस्तीवरील पोलिसांना गुंगारा देत जुळया नंबर प्लेट वापरून संशयितानी कितीवेळा असे कारनामे केले याचीही कसून चौकशी होणे गरजेचे आहे. एवढया मोठय़ा प्रमाणात दारू तस्करी उघडकीस आल्यामुळे चेकनाक्यावरील पोलिसांना डोळय़ात तेल घालून पहारा द्यावा लागणार आहे.