एकमेव कसोटीनंतर तीन वनडे, तीन टी-20 सामन्यांची मालिका
वृत्तसंस्था/ लंडन
येत्या जून-जुलैमध्ये भारतीय महिला संघ इंग्लंडमध्ये एकमेव कसोटी खेळणार असून पूर्ण लांबीच्या या दौऱयात तीन वनडे व तीन टी-20 सामनेही हा संघ खेळणार आहे. एकमेव कसोटी ब्रिस्टॉलमध्ये खेळविली जाणार आहे.
16-19 जून या कालावधीत होणाऱया या कसोटीने महिलांच्या या दौऱयाची सुरुवात होणार आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच बीसीसीआय सचिव जय शहा यांनी या कसोटीला मान्यता दिली होती. पण त्याची निश्चित तारीख व सामन्याचे ठिकाण मंगळवारी यजमान ईसीबीने जाहीर केले. 2014 नंतर प्रथमच भारतीय महिला संघ इंग्लंडमध्ये कसोटी खेळणार आहे तर इंग्लंडने 2019 मध्ये महिलांच्या ऍशेस मालिकेत शेवटची कसोटी खेळली होती. या कसोटीनंतर तीन वनडे व तीन टी-20 सामने खेळविले जातील आणि चेम्सफर्डमध्ये 15 जुलै रोजी दौऱयाची सांगता होणार आहे.
मायदेशात होणाऱया मालिकांच्या वेळापत्रकांची घोषणा केल्यानंतर ईसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टॉम हॅरिसन म्हणाले की, ‘पुढील मोसमात भरगच्च कार्यक्रम असून इंग्लंड महिला संघासाठी गजबजणारे वर्ष ठरणार आहे. भारत व न्यूझीलंड महिला संघ येथे येणार असल्याने त्यांचे सामने आयोजित करण्यासाठी आम्ही उत्सुक झालो आहोत. दोन्ही मालिका द हंड्रेड स्पर्धेच्या मागे-पुढे होणार आहेत. याशिवाय रॅचेल हेहो फ्लिंट ट्रॉफी व नवी रीजनल टी-20 स्पर्धाही होणार असल्याने खेळाडू व चाहत्यांना मोठी पर्वणी मिळणार आहे. 2022 महिला विश्वचषक स्पर्धेवर लक्ष ठेवून आपल्या महिला संघाला त्याची तयारी करण्यासाठी या मालिका व स्पर्धा महत्त्वाच्या ठरणार आहेत. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये इंग्लंड महिला संघ पाक दौऱयावर जाणार असल्याने महिला संघाला भरगच्च कार्यक्रम असणार आहे,’ असेही ते म्हणाले.
भारताविरुद्धची मालिका झाल्यानंतर द हंड्रेड स्पर्धा होईल. त्यानंतर इंग्लंड व न्यूझीलंड महिला संघांत तीन टी-20 व पाच वनडे सामने सप्टेंबरमध्ये होतील. भारताविरुद्धच्या मालिकेचे वेळापत्रक
जून 16-19-एकमेव कसोटी, ब्रिस्टॉल
जून 27-पहिला वनडे सामना, ब्रिस्टॉल
जून 30-दुसरा वनडे सामना, टाँटन
जुलै 3-तिसरा वनडे सामना, वोर्सेस्टर
जुलै 9-पहिली टी-20 लढत, नॉर्दम्प्टन
जुलै 11-दुसरी टी-20 लढत, होव
जुलै 15-तिसरी टी-20 लढत, चेम्सफर्ड.