वृत्तसंस्था/ मुंबई
देशातील व्यापारी व उद्योग क्षेत्रातील तेजी वाढल्याने जीएसटीसोबत अन्य कामगिरीत सकारात्मक बदल पहावयास मिळत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये जून महिन्यात प्रथम जीएसटी आकडेवारी आणि आता ई-वे बिलाचे सादरीकरण यांच्यात सुधारणा होत असल्याचे पहावयास मिळाले आहे. जीएसटी नेटवर्कने दिलेल्या माहितीनुसार जूनमध्ये एकूण 4.27 कोटी ई-वे बिल सादर करण्यात आली आहेत. हाच आकडा कोविडच्या अगोदर महिन्याला 5.2 कोटींच्या घरात राहिलेला आहे.
कर चोरीला आळा घालण्यासाठी सरकारने ई-वे बिलाची योजना लागू केली आहे. यामध्ये राज्य आणि राज्यांच्या बाहेर जाणाऱया वस्तुंवर हे ई वे बिल लागू केले जाते. यात जर साहित्याची किमत 50 हजार रुपयापेक्षा अधिक असली तरी त्या बिलास साहित्यासोबत ठेवले जाते.
जीएसटी नेटवर्क आणि सादर करण्यात आलेले आकडे याच्या तुलनेत जूनमध्ये ई वे बिल बनविण्यासाठी 12.40 लाख कोटी रुपयापेक्षा अधिक साहित्याची देवाणघेवाण झाली आहे. या दरम्यान दररोज 14.26 लाख ई वे बिल सादर करण्यात आले आहेत. हा आकडा लॉकडाऊनच्या अगोदरच्या आकडेवारीसोबत मिळत जुळता असल्याचे पहावयास मिळाले असल्याचे सांगितले आहे. म्हणजे जूनमध्ये जवळपास 77 टक्के हिस्सा प्राप्त केला आहे.