12 वीच्या परीक्षेत 75 टक्क्यांची अट संपुष्टात
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
शिक्षण मंत्रालयाने जेईई मेन्स परीक्षेची तयारी करणाऱया विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी मंगळवारी ट्विट करत जेईई परीक्षा वर्ष 2021-22 साठी 12 वीत 75 टक्के गुणांच्या पात्रतेची अट संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली आहे. जेईई मेन्स परीक्षेच्या अंतर्गतच एनआयटी, आयआयटी, एसपीए आणि अन्य सीएफटीआय संस्थांमध्ये प्रवेश मिळतो.
संयुक्त प्रवेश परीक्षेसाठी (जेईई) बारावीत किमान 75 टक्के गुण आता बंधनकारक नसल्याचे निशंक यांनी स्पष्ट केले आहे. जेईई मेन्स परीक्षा 4 वेळा आयोजित करणार असल्याची घोषणा निशंक यांनी मागील महिन्यात केली होती. याचा पहिला टप्पा 23 ते 26 फेब्रुवारी 2021 पर्यंत आयोजित केला जाणार आहे. त्यानंतर मार्च, एप्रिल आणि मे 2021 मध्ये पुढील तीन सत्रे होणार आहेत.
आयआयटीत प्रवेशासाठी संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई) आणि वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशासाठीच्या (नीट) अभ्यासक्रमात कुठलाच बदल होणार नसल्याची माहिती शिक्षण मंत्र्यांनी दिली आहे. विद्यार्थ्यांना जेईई आणि नीट परीक्षेत मर्यादित प्रश्नांची उत्तरे देण्याचा पर्याय दिला जाणार आहे. शिक्षण मंत्रालयानुसार जेईई मेन्स 2021 चा अभ्यासक्रम मागील वर्षासारखाच राहणार आहे. परंतु विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेतील 90 प्रश्नांपैकी 75 प्रश्नांची उत्तरे देण्याचा पर्याय मिळणार आहे.