गुवाहाटी
सप्टेंबरमध्ये पार पडलेल्या जॉइंट एंट्रेन्स एक्झाम (जेईई) मेन्समध्ये आसाममध्ये पहिला आलेला विद्यार्थी नक्षत्र दास आणि त्याचे वडिल डॉ. ज्योर्तिमय दास यांना पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांवर डमी विद्यार्थ्याला परीक्षेस बसविल्याचा आरोप आहे.
आरोपी नक्षत्रने जेईई मेन्समध्ये 99.8 टक्के गुण मिळवून आसाममधून पहिले स्थान मिळविले होते. याप्रकरणी परीक्षा केंद्राच्या 3 कर्मचाऱयांना पोलिसांनी अटक केली आहे. या सर्वांना गुरुवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.
याप्रकरणी आणखीन काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे. केवळ एका विद्यार्थ्याचे नव्हे तर याहून मोठा घोटाळा असू शकतो, असे पोलिसांनी म्हटले आहे. पोलिसांनुसार परीक्षा केंद्राच्या कर्मचाऱयाने आरोपीला मदत केली होती. आरोपी परीक्षेच्या दिवशी केंद्रावर गेला होता, परंतु उत्तरपत्रिकेवर नाव आणि परीक्षार्थीचा क्रमांक लिहून परतला होता. त्याच्या जागी अन्य कुणीतरी परीक्षा दिली होती. पोलिसांनी नॅशनल टेस्टिंग एजेन्सीला या घटनेची माहिती दिली आहे. तसेच परीक्षा केंद्र बंद करून व्यवस्थापनाला समन्स बजावला आहे.
ध्वनिफित प्रसारित
याप्रकरणी मित्रदेव शर्मा नावाच्या व्यक्तीने 23 ऑक्टोबर रोजी तक्रार नोंदविली होती. समाजमाध्यमांवर एका फोनकॉलची ध्वनिफित आणि व्हॉट्सऍपवरील संभाषण प्रसारित झाले होते. ध्वनिफित आणि संभाषणातून आरोपी नील नक्षत्र दास याने केलेली फसवणूक स्पष्ट झाली होती.