@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यावश्यक असलेली ‘नीट’ व आयआयटीसह नामांकित अभियांत्रिकी संस्थांमधील प्रवेशासाठी अनिवार्य असलेली ‘जेईई मेन’ परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने घेतला आहे. या प्रवेश परीक्षा आता जुलैऐवजी सप्टेंबरपर्यंत लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. दोन्ही प्रवेश परीक्षांचे सुधारित वेळापत्रक ‘एमएचआरडी’ने प्रसिद्ध केले असून ‘जेईई मेन’ परीक्षा 1 ते 6 सप्टेंबर, तर जेईई ऍडव्हान्स परीक्षा 27 सप्टेंबर रोजी होणार आहे. तसेच ‘नीट’ परीक्षा 13 सप्टेंबर रोजी होणार असल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल-निशंक यांनी शनिवारी दिली. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने समिती नेमून त्याचा अहवाल देण्याचे आदेश दिले होते. या समितीने देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेत अहवाल दिल्यानंतर नीट आणि जेईई परीक्षा तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.