ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात वाढत चाललेली कोरोना रुग्णांची वाढती संख्या, सध्याची परिस्थिती लक्षात घेत भारतीय प्रौद्योगिकी संस्था आयआयटी खरगपूरने 3 जुलै रोजी होणारी जेईई ॲडव्हान्स 2021 परीक्षा पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आली आहे. यंदा कोरोनामुळे जेईई मेन परीक्षा देखील घेण्यात आलेली नाही.
आयआयटी खरगपूरकडून सांगण्यात आले आहे की, कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती पूर्णपणे सुधारल्या नंतर जेईई ॲडव्हान्स परीक्षेची नवीन तारीख जाहीर केली जाणार आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी जेईई ॲडव्हान्स 2021 परीक्षा 3 जुलै रोजी घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. त्यावेळी ते म्हणाले होते की, परीक्षेसाठी लागणारी 75 टक्केची अट रद्द करण्यात आली आहे. केंद्र सरकारने जेईई मेन 2020 परीक्षेमध्ये क्वालिफाय झालेल्या पण कोरोनामुळे दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा देऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना जेईई ॲडव्हान्स 2021 च्या परीक्षेला बसण्याची परवानगी देण्यात आली होती. पण आता ही परीक्षा देखील स्थगित करण्यात आली आहे.
दरम्यान, यावर्षी 2.5 लाख विद्यार्थी जेईई ॲडव्हान्स परीक्षा देणार होते. 3 जुलै रोजी पहिला पेपर सकाळी 9 ते 12 आणि दुपारी 2.30 ते 5.30 या वेळेत दुसरा पेपर होणार होता. मात्र आता पुढील आदेशापर्यंत परीक्षा स्थगित करण्यात आली आहे.