हिंसाचाराला 3 जानेवारीच्या घटनेची पार्श्वभूमी : सीसीटीव्ही फुटेज मिळण्याची शक्यता कमी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जवाहरलाल नेहरू विद्यापीठात रविवारी झालेल्या हिंसाचारातील गुन्हेगारांच्या विरोधात पुरावे जमविताना दिल्ली पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेला कडाक्याच्या थंडीतच ‘घाम’ फुटू लागला आहे. जेएनयू प्रशासनाची धरसोड भूमिका, स्थानिक पोलिसांचा निष्काळजीपणा, डाव्या संघटनेच्या विद्यार्थ्यांकडून विद्यापीठाची पूर्ण इंटरनेट नेटवर्क यंत्रणा (सर्व्हर कंट्रोल रुम) ध्वस्त करण्यात आल्याने तपास पथकासमोर अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. या सर्व कारणांमुळे सीसीटीव्ही फुटेज मिळण्याची शक्यता फारच कमी आहे.
5 जानेवारी रोजी रविवारी दुपारपासून रात्रीपर्यंत विद्यापीठातील हिंसाचाराची चौकशी गुन्हे अन्वेषण विभागाला सोपविण्यात आली आहे. 5 जानेवारी रोजी परिसरात झालेल्या हिंसाचाराची पार्श्वभूमी 3 जानेवारी रोजीच तयार झाली होती. 3 रोजीच्या भांडणाने रविवारी हिंसक वळण घेतले. जेएनयू विद्यार्थीसंघाच्या भूमिकेच्या विरोधात जात विद्यापीठ प्रशासनाने अस्थायी प्रवेश प्रकियेला ‘ऑनलाईन’ प्रारंभ केल्याने हे भांडण सुरू झाले होते. विद्यापीठाचा हा निर्णय विद्यार्थीसंघाच्या नेत्यांच्या पचनी पडला नाही. याच कारणामुळे डाव्या संघटनांच्या विद्यार्थ्यांनी इंटरनेट सर्व्हर रुममध्ये शिरून त्याचे नुकसान घडवून आणले. याप्रकरणी विद्यापीठ प्रशासनाकडून 3 जानेवारी रोजीच पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली होती.
हिंसेचा कुणी साक्षीदार असल्यास किंवा कुणाकडे संबंधित छायाचित्रे आणि चित्रफिती असल्यास त्याने तपास पथकाशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस उपायुक्तांनी केले आहे. सर्व्हर रुमची तोडफोड झाल्याने इंटरनेट नेटवर्क पूर्णपणे ठप्प झाले आणि प्रवेश प्रक्रियाही थांबल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
सर्व्हर यंत्रणा अद्याप नादुरुस्त
सर्व्हर रुम अद्याप पूर्णपणे सक्रीय झालेला नाही. नेटवर्क कनेक्टिव्हिटी सुरू करण्याचे प्रयत्न चालू आहेत. सर्व्हर रुम उद्ध्वस्त करण्यात आल्याने गुन्हे अन्वेषण पथकासमोरील गुंता वाढला आहे. सीसीटीव्ही कॅमेऱयांनी काम करणे थांबविले होते. त्यामुळे हिंसाचाराशी संबंधित सीसीटीव्ही फुटेजच्या नावावर एक-दोन पुरावेच हाती लागले आहेत. पीडित विद्यार्थी अद्याप मौन बाळगून असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.