ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :
जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये झालेल्या हल्ल्यातील अज्ञात हल्लेखोरांची ओळख आम्हाला पटली आहे असं दिल्ली पोलिसांनी पत्रकारांना सांगितलं. जॉय टिर्की डीसीपी क्राईम यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी दिल्ली पोलिसांनी हल्लेखोरांचे फोटो प्रसिद्ध केले आहेत. जेएनयू विद्यार्थी संघटनेची अध्यक्षा आयशी घोष हिच्यासह 9 हल्लेखोर होते. प्रसिद्ध झालेल्या फोटोंमध्ये आरोपींची नावंही देण्यात आली आहेत. यात जेएनयूचे माजी विद्यार्थी चुनचुन कुमार, सुचेता तालुकदार आणि प्रिया रंजनदेखील आहे.
डीसीपी जॉय टिर्की म्हणाले, आम्ही आत्तापर्यंत काही संशयितांना ताब्यात घेतलेलं नाही मात्र हल्लेखोर डाव्या संघटनांशी संबंधित आहेत. यावेळी पोलीसांनी 3 जानेवारी ते 5 जानेवारीपर्यंतचा घटनाक्रम विशद केला. तसेच सीसीटीव्ही फुटेजही दाखवलं. आत्तापर्यंत हिंसाचार घडवणाऱया नऊ जणांची ओळख पटली आहे असंही पोलिसांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, मागच्या रविवारी काही मास्क लावलेल्या हल्लेखोरांनी जवाहरलाल नेहरु विद्यापीठात काही विद्यार्थ्यांवर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आइशी घोष आणि इतर काही विद्यार्थी गंभीर जखमी झाले. तेव्हापासून हा विषय देशाच्या राजकारणात पेटला आहे.