प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यातही कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. त्यामुळे राज्यात प्रतिदिन 44 टन द्रवरुप ऑक्सिजन पुरवठा करण्यास जेएसडब्ल्यू स्टील कंपनीने संमती दर्शविली आहे. खाण आणि भूविज्ञानमंत्री मुरुगेश निराणी यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी जेएसडब्ल्यू स्टील कंपनीचे उपव्यवस्थापक संचालक डॉ. विनोद नोवल व त्यांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. यावेळी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी भर पडत आहे. अतिदक्षता विभागातील रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासत असल्याबद्दल बैठकीत चिंता व्यक्त झाली. दरम्यान, राज्यातील गंभीर परिस्थितीवर मात करण्यासाठी मंत्री मुरुगेश निराणी यांनी इस्पितळांना ऑक्सिजन सिलिंडर्स पुरवठा वाढविण्याची मागणी बैठकीप्रसंगी केली.
बैठकीप्रसंगी डॉ. विनोद नोवल यांनी दिवसाला 400 टन द्रवरुप ऑक्सिजन पुरवठा करण्यास संमती दर्शविली. राज्यात कोरोनामुळे निर्माण झालेला ऑक्सिजन तुटवडा कमी करण्यासाठी आपली कंपनी सरकारला सर्वतोपरिने सहकार्य करेल, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.
ऑक्सिजन उत्पादन केंद्रांना 5-6 दिवसांत परवानगी
इस्पितळांना ऑक्सिजन पुरवठा वाढविण्यासाठी नवी ऑक्सिजन उत्पादन केंद्रे सुरू करण्यासाठी पाच-सहा दिवसांमध्ये परवानगी देण्यात येईल, अशी माहिती उद्योगमंत्री जगदीश शेट्टर यांनी दिली. कर्नाटक उद्योग मित्र कार्यालयात मंगळवारी विविध खात्यातील अधिकाऱयांच्या बैठकीत त्यांनी ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी सर्व खात्याने समन्वय राखून काम करण्याची सूचना अधिकाऱयांना दिली.