भुवनेश्वर
पोलाद उत्पादक कंपनी जेएसडब्ल्यू ही पुढील 10 वर्षाच्या काळात 1 लाख कोटी रुपये ओडिशात गुंतवणार आहे. जेएसडब्ल्यूचे चेअरमन सज्जन जिंदाल यांनी ही माहिती नुकतीच दिली.
ओडिशा राज्यात कंपनीचा नवा पोलाद कारखाना बांधला जाणार आहे. राज्यातील जगतसिंगपूर जिल्हय़ातील जटाधर येथे नवा पोलाद कारखाना कंपनीकडून सुरू केला जाणार आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्यासोबत सज्जन जिंदाल यांनी नुकतीच यासंदर्भात व्हिडीयोकॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठक घेतली होती. या बैठकीत नव्या प्लांटबाबत आणि एकूण गुंतवणूकीबाबत उभयपक्षी सविस्तर चर्चा झाली. सदरच्या प्रस्तावीत प्रकल्पासाठी राज्याने लागणारी जमीन, वीज व पाणी उपलब्ध करण्याचे मान्य केले आहे. जेएसडब्ल्यूनेही राज्याकडून अपेक्षीत प्रतिसाद मिळाल्याने समाधान व्यक्त केले आहे. या नव्या प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे सज्जन जिंदाल यांनी सांगितले.