यशस्वी तोडग्यानंतर प्रकरण शमले
प्रतिनिधी/ पणजी
दोनापावला येथे जेटीच्या परिसरात वाहने नेण्यास बंदी असतानाही पोलीस भेदभाव करत पर्यटकांना झुकते माप देत असल्याचा आरोप करत शनिवारी काही स्थानिकांनी पोलीस स्थानकावर मोर्चा नेला.
हल्लीच दोनापावला जेटीचे उद्घाटन करून ती पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहे. त्यामुळे तेथे जाण्यासाठी दिवसभरात शेकडो वाहने येत असतात. त्याशिवाय स्थानिकांचीही वाहने असतात. परंतु आता न्यायालयाने त्या परिसरात वाहने नेण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे कोणतेही वाहन त्या भागात जाऊ शकत नाही. तरीही काही प्रमाणात सूट देताना न्यायालयाने स्थानिकांच्या वाहनांसाठी विशेष ओळख पास देण्यास सांगितले आहे. सध्यातरी असे पासेस देण्यात आलेले नाही. त्यामुळे स्थानिक कोण आणि पर्यटक कोण याची नेमकी पडताळणी होत नाही. त्यातूनच वारंवार वाद निर्माण होत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार पोलीस भेदभाव करत असून त्या परिसरातील स्थानिकांना डावलतात व तेथील बड्या हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांच्या वाहनांना सूट देतात. त्यामुळे स्थानिकांना त्यांची वाहने घरापर्यंत नेता येत नाहीत, असा आरोप करण्यात आला.
त्यातूनच शनिवारी सकाळी काही स्थानिक जमून पोलीस स्थानकावर आले व त्यांनी पोलिसांना जाब विचारला. तत्पूर्वी त्यांनी स्वत:ची वाहने आडवी घालून रस्ता अडवून ठेवला. हा वाद सुमारे तासभर चालला. तोपर्यंत त्यांच्या प्रतिनिधींनी दोनापावला स्थानकावरील निरीक्षक व अन्य अधिकाऱ्यांशी चर्चा केली. स्थानिक नगरसेवक नेल्सन आल्बुकर्क यांनीही तेथे भेट देऊन नागरिकांची समजूत काढली व न्याय देण्याचे आश्वासन दिले. त्यातून सर्वमान्य असा तोडगा काढण्यात आला व नंतर रस्ता मोकळा करण्यात आला.
दरम्यान, हे प्रकार यापुढेही असेच चालू राहिल्यास कायदा हातात घेण्याचा इशारा तेथे मोठ्या प्रमाणात जमलेल्या महिलांनी दिला आहे.