बेंगळूर/प्रतिनिधी
जेडी (एस) नेते एचडी कुमारस्वामी यांनी बुधवारी सांगितले की, कर्नाटकातील २०२३ च्या विधानसभा निवडणुकीसाठी किमान ३०-३५ मतदारसंघात महिला उमेदवार उभे करण्याची पक्षाची योजना आहे. ते म्हणाले की पक्षाला संघटनेच्या कामात मदत करण्यासाठी महिला उमेदवारांना प्राधान्य द्यायचे आहे आणि त्यांची महिला शाखा मजबूत करायची आहे.
“आम्हाला या वेळी २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत अधिक महिला उमेदवार उभे करायचे आहेत, किमान३०-३५ जागांवर (एकूण 224 पैकी) आम्हाला महिलांना उमेदवारी देत मैदानात उतरवायचे आहे, आम्ही मतदारसंघ निश्चित करत आहोत. पहिल्या टप्प्यात आम्ही सहा ते सात महिलांना उमेदवारी देण्याचे ठरविले आहे, ” असे कुमारस्वामी म्हणाले.
दरम्यान, कर्नाटकात २०२३ रोजी विधानसभेची निवडणूक होणार आहे. भाजप आपली सत्ता कायम राखण्यासाठी आतापासूनच कामाला लागली आहे. काँग्रेस प्रत्येक जिल्ह्यात जाऊन पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर देत आहे. तर जेडीएस २०२३ च्या निवडणुकीत जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याच्या तयारीला लागला आहे.