बुंदेस्लिगा फुटबॉल : गोरेत्झ्काचा गोल निर्णायक, डॉर्टमंडच्या विजयात हालँडची चमक
बर्लिन
बुंदेस्लिगा फुटबॉलचे सलग आठव्यांदा जेतेपद मिळण्यासाठी बायर्न म्युनिच संघ केवळ एक विजय दूर असून येथे झालेल्या सामन्यात त्यांनी बोरुसिया माँचेनग्लाडबाचवर 2-1 असा विजय मिळविला. लिऑन गोरेत्झ्काचा गोल बायर्नसाठी निर्णायक ठरला.
युवा स्ट्रायकर जोशुआ झिर्कीने बायर्नला आघाडीवर नेल्यानंतर बायर्नच्या बेंजामिन पॅव्हर्डने स्वयंगोल केल्याने ग्लाडबाचला बरोबरी साधता आली. सामना संपण्यास चार मिनिटे बाकी असताना गोरेत्झ्काने निर्णायक गोल नोंदवून बायर्नचा विजय निश्चित केला. त्याचा हा पाच सामन्यांतील तिसरा गोल होता. या सामन्यात रॉबर्ट लेवान्डोवस्की व थॉमस म्युलर नसले तरी बायर्नने या मोसमातील सर्व स्पर्धांतील सामन्यांत मिळून सलग 13 वा विजय नोंदवला. या विजयासह बायर्नने बोरुसिया डॉर्टमंडवरील 7 गुणांची आघाडी पुन्हा मिळविली आहे. या स्पर्धेचे अजून तीन सामने बाकी आहेत. त्यांचा पुढील सामना मंगळवारी वेर्डर ब्रेमेनविरुद्ध होणार असून हा सामना जिंकल्यास बायर्नचे जेतेपदही निश्चित होणार आहे. तसे झाल्यास हॅन्सी फ्लिक यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्याच मोसमात बायर्न जर्मन चॅम्पियन्स होणार आहे.
डॉर्टमंडचा एकमेव गोलने विजय
अन्य एका सामन्यात बोरुसिया डॉर्टमंडने बदली खेळाडू एर्लिंग हालँडने स्टॉपेज टाईममध्ये हेडरवर नोंदवलेल्या गोलाच्या बळावर फोर्चुना डय़ुसेलडॉर्फवर 1-0 असा विजय मिळविला. हा विजय मिळवित त्यांनी बायर्न म्युनिचविरुद्धचे अंतर 4 गुणांवर आणले होते. पण बायर्नने नंतर माँचेनग्लाडबाचवर विजय मिळवित सात गुणांची आघाडी पुन्हा हस्तगत केली. दुसऱया स्थानावर असणाऱया डॉर्टमंडचे आता 31 सामन्यांत 66 गुण तर अग्रस्थानावरील बायर्नचे 73 गुण झाले आहेत.
या सामन्यात डॉर्टमंड फारसे फॉर्ममध्ये असल्याचे दिसून आले नाही. त्यांना अनेकदा बचाव करावा लागला. राफाएल गुरेरोने साठाव्या मिनिटाला गोलच्या दिशेने जोरदार फटका मारत गोल नोंदवला होता. पण व्हीएआर रिव्हय़ू पाहिल्यानंतर तो रद्द करण्यात आला. कारण चेंडू गुरेरोच्या खांद्याला लागून डिफ्लेक्ट झाल्याचे त्यात दिसून आले. फोर्चुना डय़ुसेलडॉर्फला दोनदा आघाडी घेण्याची संधी मिळाली होती. पण 82 व 90 व्या मिनिटाला स्टीव्हन स्क्रझिबस्कीने मारलेले फटके गोलपोस्टला लागून बाहेर गेले. मात्र स्टॉपेज टाईममध्ये हालँडने लीगमधील 12 सामन्यांतील 11 वा गोल नोंदवून सामन्याचा निकाल निश्चित केला. मॅन्युएल अकान्जीने दिलेल्या क्रॉसवर उंच उडी घेत हेडरवर त्याने हा गोल नोंदवला. या विजयानंतर डॉर्टमंडने तिसऱया स्थानावरील आरबी लीपझिगवरील चार गुणांची आघाडी कायम ठेवली आहे. लीपझिगने शुक्रवारच्या सामन्यात प्रतिस्पर्ध्यांवर 2-0 असा विजय मिळविला होता तर वेर्डर ब्रेमेनने पेडरबॉर्नवर 5-1 असा मोठा विजय मिळविला. फॉर्चुनाइतकेच ब्रेमेनचेही 28 गुण झाले आहेत. युनियन बर्लिननेही कोलॉनवर 2-1 असा विजय मिळवित 13 वे स्थान मिळविले. त्यांचे 35 गुण झाले आहेत.