21 रोजी आयोजन, विशेष व्हीडिओचे प्रकाशन
प्रतिनिधी /पणजी
कोरोना महामारीमुळे गत वर्षापासून आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात अडचण निर्माण होत आहे. यंदाही तशीच परिस्थिती आहे. त्यामुळे यंदा ’जेथे आपण तेथे योग’ या संकल्पनेवर हा दिवस साजरा करण्याचे ठरविण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली.
पणजीत आयोजित कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. दि. 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय योग दिवस ही भारताची जगाला देणगी आहे. यंदा सातवा योग दिवस साजरा करण्यात येणार होता. परंतु कोरोनामुळे त्यात बाधा आली आहे. तरीही कोणत्याही जाहीर कार्यक्रमापेक्षा प्रत्येकाने स्वतःच्या घरीच किंवा ’जेथे आपण तेथे योग’ या संकल्पनेवर हा दिवस साजरा करावा, असे श्री. नाईक यांनी सांगितले. त्याही परिस्थितीत एखादे राज्य किंवा एखाद्या ठिकाणी कार्यक्रमाचे नियोजन केलेच असेल तर कोरोनाची सर्व मार्गदर्शक तत्वे पाळूनच व 50 पेक्षा कमी उपस्थितीत कार्यक्रम होणार आहेत, असे त्यांनी पुढे स्पष्ट केले.
या दिवसानिमित्त गोवा योग अकादमीतर्फे खास व्हीडिओची निर्मिती करण्यात आली आहे. त्यातून योगासंबंधी सर्व माहिती तसेच तज्ञांद्वारे योगासनांची प्रात्यक्षिके दाखविण्यात येणार आहेत. विविध माध्यमांतून हा व्हीडिओ सर्वांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. त्याचा लाभ घेऊन प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक सदस्याने हा व्हीडिओ पाहून योग करावा व या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन नाईक यांनी केले.
या कार्यक्रमात श्री. नाईक यांच्याहस्ते सदर व्हीडिओचे प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी गोवा आयुष सेलचे उपसंचालक डॉ. दत्ता भट, गोवा राज्य योग अकादमीचे योगी प्रदीप नागवेकर, महिला प्रमुख निलम मराठे, युवा प्रमुख दामोदर गोवेकर, सचिव रामचंद्र भरणे यांची उपस्थिती होती. अक्षय आणि प्रथमेश यांनी अत्यंत कल्पकतेने प्रत्यक्ष निसर्गाच्या सानिध्यात या व्हीडिओचे चित्रिकरण केले आहे.
डॉ. दत्ता भट यांनीही विचार मांडले. शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक उन्नती तसेच आरोग्यवृद्धीसाठी योग सर्वार्थाने परिपूर्ण आहे. त्यामुळेच सर्वांनी या कार्यक्रमात सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
मिलिंद महाले यांनी सुत्रसंचालन केले. त्यावेळी बोलताना त्यांनी, योग आणि श्रीपाद नाईक यांचे अतुट नाते आहे. सात वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय योग दिनाची घोषणा करण्यात आली. तेव्हापासून या दिवसाला ’योग दिवस’ अशी ओळख प्राप्त झाली. याकामी श्री. नाईक यांचे मोठे योगदान असल्याचे ते म्हणाले.