एंगेजमेंटच्या 20 वर्षांनी विवाहबंधनात
हॉलिवूड अभिनेत्री-गायिका जेनिफर लोपेझने अभिनेता बेन आफ्लेकसोबत लास वेगासमध्ये विवाह केला आहे. 52 वर्षीय जेनिफर 49 वर्षीय बेनसोबत रिलेशनशिपमध्ये होती. परंतु मधल्या काळात दोघांनी ब्रेकअप केले होते. परंतु मागील वर्षी दोघेही पुन्हा रिलेशनशिपमध्ये आले होते. जेनिफरने विवाहानंतर स्वतःचे आडनाव बदलून जेनिफर आफ्लेक केले आहे.
या जोडप्याने 2002 साली एंगेजमेंट केली होती. परंतु काही कारणांमुळे त्यांचे नाते एक वर्षाने तुटले होते. त्यानंतर दोघेही वेगळे झाले होते आणि दोघांनीही अन्य कुणासोबत विवाह केला होता. परंतु मागील वर्षी जेनिफर आणि बेन हे पुन्हा रिलेशनशिपमध्ये आले आणि एप्रिल महिन्यात त्यांनी पुन्हा एंगेजमेंट केली होती. जेनिफरला दोन मुले असून हा तिचा चौथा विवाह आहे.
जेनिफरचा जवळचा मित्र आणि हेयर स्टायलिस्ट क्रिस ऍपलटाउनने सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या ब्रायडल लुकचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओत जेनिफरल सिंपल व्हाइट वेडिंग गाउनमध्ये दिसून येते.
जेनिफर आणि बेन यांनी स्वतःच्या विवाहाची घोषणा एक न्यूजलेटरद्वारे केल्याचे समजते. जोडप्याने नेवादामध्ये शनिवारी रात्री एका चॅपेलमध्ये विवाह केला आहे. ‘प्रेम सुंदर अन् दयाळू आहे. 20 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्रेम धैर्यवान असल्याचे समजले’ असे न्यूजलेटरमध्ये दोघांनी महटले आहे. जेनिफरने स्वतःला मिसेस जेनिफर लिन आफ्लेक संबोधित केले आहे.