कर्नाटकचा 25 वर्षीय जलद गोलंदाज मसाला डोसा व ब्रेट लीचा फॅन!
चेन्नई / वृत्तसंस्था
आणखी एक सामना आणि आणखी एक सनसनाटी आंतरराष्ट्रीय पदार्पण. जो कित्ता मागील काही सामन्यात कधी इशान किशन तर कधी सूर्यकुमार यादव यांनी गिरवला, तोच मंगळवारच्या पहिल्या वनडे सामन्यात कर्नाटकाचा युवा जलद गोलंदाज एम. प्रसिद्ध कृष्णाने देखील गिरवला. कृष्णाने 54 धावात 4 बळी, अशी भारतीय खेळाडूंच्या पदार्पणातील सर्वोत्तम कामगिरी नोंदवत अवघ्या क्रिकेट जगताला आपल्या आगमनाची जोरदार वर्दी दिली. अर्थात, हे प्रोडक्ट तयार होण्यामागे एका ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकाचा देखील मोलाचा वाटा राहिला आहे आणि तो ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक म्हणजे जेफ थॉमसन!
वास्तविक, प्रसिद्ध कृष्णाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिल्या स्पेलमधील गोलंदाजी बरीच महागडी ठरली होती. त्याला केवळ 3 षटकातच 37 धावा मोजाव्या लागल्या होत्या. पण, नंतर दुसऱया स्पेलमध्ये त्याने अतिशय भेदक मारा साकारत इंग्लंडच्या फलंदाजांना जेरीस आणण्यात अजिबात कसर सोडली नाही. या लढतीत त्याने सलामीवीर जेसॉन रॉय (46), अष्टपैलू बेन स्टोक्स (1), सॅम बिलिंग्ज (18) व टॉम करण (11) यांचे बळी घेतले.
एम. प्रसिद्ध कृष्णा दोन बाबींचा फॅन आहे तो म्हणजे मसाला डोसा आणि ब्रेट ली, असे त्याचे वडील मुरली कृष्णा सांगतात. वयाच्या 11 व्या वर्षीच प्रसिद्ध कृष्णा ऑस्ट्रेलियात गेला आणि तेथे त्याने जलद गोलंदाजीचे धडे गिरवले. यासाठी त्याला महान गोलंदाज थॉमसन यांचे प्रशिक्षण लाभले. 2017 मध्ये आयडीबीआय फेडरल बॉलिंग फेडरेशनच्या माध्यमातून तो तुषार देशपांडे व आणखी दोघांसह ऑस्ट्रेलियाला गेला होता.
ऑस्ट्रेलियातील प्रशिक्षणाचा फायदा
माजी क्रिकेट प्रशासक व स्तंभलेखक मकरंद वायंगणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसिद्ध कृष्णासाठी ब्रिस्बेनमधील क्रिकेट ऑस्ट्रेलिया अकादमीतील प्रशिक्षण विशेष महत्त्वाचे ठरले. ‘एम. प्रसिद्ध कृष्णा अतिशय हुशार गोलंदाज आहे आणि पहिल्या 3 षटकात धुलाई झाल्यानंतरही या हुशारीमुळेच त्याने जोरदार मुसंडी मारली’, असे वायंगणकर म्हणतात.
कृष्णाने प्रशिक्षण घेतलेल्या एमआरएफ पेस फाऊंडेशनमधील मुख्य प्रशिक्षक एम. सेंथिलनाथन यांचेही असेच मत आहे. ‘आम्ही त्याला 2017 मध्ये निवडले. त्यापूर्वी, 2015 मध्ये बांगलादेश अ संघाविरुद्ध कर्नाटकतर्फे खेळताना त्याने लक्षवेधी मारा केला होता. ग्लेन मॅकग्राकडूनही त्याने गोलंदाजीचे धडे गिरवले’, असे सेंथिलनाथन म्हणाले.
2019 मध्ये एमआरएफ पेस फाऊंडेशन व क्रिकेट ऑस्ट्रेलिया यांच्यातील उपक्रमांतर्गत प्रसिद्ध कृष्णाने 2019 मध्ये ब्रिस्बेनच्या सीए सेंटर ऑफ एक्सलन्स भेटीत आपल्या गोलंदाजीवर बरीच मेहनत घेतली. प्रसिद्ध कृष्णाचे वडील देखील क्रिकेटपटू राहिले असून महाविद्यालयीन संघाचे त्यांनी प्रतिनिधीत्व केले आहे.
‘प्रसिद्धने 11 व्या वर्षापासून क्रिकेटचे धडे गिरवले आणि शालेय क्रिकेटमध्ये अष्टपैलू खेळाडू या नात्याने त्याने लक्षवेधी कामगिरी केली. 14 व्या वर्षापासून त्याने गोलंदाजीवर अधिक मेहनत घेण्यास सुरुवात केली. तो ब्रेट लीचा चाहता आहे. लीप्रमाणे जलद, तिखट मारा करणे त्याला आवडते आणि मसाला डोसा हा त्याचा वीक पॉईंट’, असेही सिनियर कृष्णा याप्रसंगी म्हणाले.