कोलकाता : माराडोना 2017 मध्ये कोलकात्यात आले, त्यावेळी त्यांनी भारतातील प्रचंड फुटबॉलप्रेम अनुभवले आणि याच अनुभूतीपोटी ते उद्गारले होते, मी कोलकात्यात पुन्हा एकदा बिग टाईमची अनुभूती देईन. पण, बुधवारी त्यांची प्राणज्योत मालवली आणि हा बिगटाईम यानंतर कधीच येणार नाही, याची चुटपूट अवघ्या कोलकातावासियांना लागून राहिली आहे.
भारताला फुटबॉलची अनेक दशकांची परंपरा आहे. भारतातील फुटबॉल चाहते, खेळाडू, संघटना जागतिक स्तरावरील फुटबॉलला मनापासून दाद देतात आणि अर्थातच, त्यांच्यासाठीही माराडोना गळय़ातील ताईत ठरत आला. या खेळालाच माराडोनाने लोकप्रियता मिळवून दिली. 1986 वर्ल्डकप विजयाचा हे हिरो स्वतः भारतात आले, त्यावेळी त्यांना अलोट प्रेम मिळणार, हे साहजिकच होते आणि झालेही तसेच. सिटी ऑफ जॉयमध्ये माराडोना एका प्रदर्शनीय लढतीसाठी आले आणि त्यांनी अवघ्या कोलकातावासियांना खिळवून ठेवले.
योगायोग म्हणजे माजी भारतीय क्रिकेटपटू, कर्णधार सौरभ गांगुलीच्या संघाविरुद्ध ते खेळले आणि माराडोना यांच्या निधनाचे वृत्त कळाल्यानंतर सर्वप्रथम गांगुली यांचीच प्रतिक्रिया समाजमाध्यमांवर झळकत राहिली. माराडोना भारतात आले, त्यावेळी 57 वर्षांचे होते. पण, त्यानंतरही त्यांनी पायाची जादू दाखवण्यात कसर सोडली नव्हती. त्यांनी सुंदर ड्रिबलिंग केले आणि डाव्या पायाच्या खेळाची नजाकतही दाखवली. अगदी स्पॅनिश गाण्यांवर त्यांनी ठेकाही धरला. इतके अपुरे की काय म्हणून ते शालेय विद्यार्थ्यांमध्येही रमले. शॉर्ट्समध्ये दाखल झालेल्या माराडोनानी त्यावेळी अवघ्या भारतीयांचे लक्ष वेधून घेतले होते.
तीन मिनिटांचे त्यांचे स्पॅनिश भाषण देखील त्यावेळी तितकेच गाजले होते. ‘मी येथे फुटबॉलसाठी आलो आहे. भारतात फुटबॉल आणखी रुजावे, ही माझी इच्छा आहे. भारतात फुटबॉलचा स्तर उत्तम आहे. आपण सर्व जण मिळून त्यांना आणखी गती देऊ’, असे माराडोना येथील आपल्या 3 दिवसांच्या खासगी दौऱयात म्हणाले होते. माराडोना या दौऱयात उत्तमरित्या मिसळले आणि मैदानावर बसून चाहत्यांना पोझ देण्यातही त्यांनी कमीपणा मानला नाही.