मुंबई /प्रतिनिधी
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे जेष्ठ अभिनेते रमेश देव यांचं निधन झालं. वयाच्या 93 व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
आपल्या सदाबहार व्यक्तिमत्वाने आणि कसदार अभिनयाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी आपली वेगळी छाप पाडली. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी व जेष्ठ अभिनेत्या सिमा देव आणि दोन मुले अभिनेते अजिंक्य देव आणि दिग्दर्शक अभिनय देव तसेच सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.
रमेश देव यांचा जन्म ३० जानेवारी १९२६ रोजी अमरावती येथे झाला. त्यांचे आजोबा अभियंता होते. त्यांच्या राजस्थानातील जोधपूर पॅलेसच्या उभारणीतील योगदान पाहून कोल्हापूर शहराच्या उभारणीसाठी छत्रपती शाहू महाराजांनी रमेश देव यांच्या आजोबांना निमंत्रित केलं. त्यानंतर देव कुटुंबिय कोल्हापुरातच स्थायिक झाले. कोल्हापूर संस्थानात रमेश देव यांचे वडील शाहू महाराजांचे कायदेशीर सल्लागार होते.
रमेश देव यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये नायक, खलनायक अशा दोन्ही भूमिका साकारल्या. १९५१ साली त्यांनी पाटलाची पोर या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका करुन अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर १९५६ साली राजा परांजपे यांच्या ‘आंधळा मागतो एक डोळा’ या सिनेमातून त्यांनी अभिनेता म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली होती. आरती या राजश्री प्रोडक्शनच्या १९६२ सालच्या सिनेमातून त्यांनी बॉलिवुडमध्ये पदार्पण केलं.
त्यानंतर आज़ाद देश के गुलाम, घराना, सोने पे सुहागा, गोरा, मिस्टर इण्डिया, कुदरत का कानून, दिलजला, शेर शिवाजी, प्यार किया है प्यार करेंगे, इलज़ाम, पत्थर दिल, हम नौजवान, कर्मयुद्ध, गृहस्थी, मैं आवारा हूँ, तकदीर, श्रीमान श्रीमती, दौलत, अशान्ति, हथकड़ी, खुद्दार, दहशत, बॉम्बे ऐट नाइट, हीरालाल पन्नालाल, यही है ज़िन्दगी, फकीरा, आखिरी दांव, सुनहरा संसार, ज़मीर, एक महल हो सपनों का, सलाखें, ३६ घंटे, प्रेम नगर, गीता मेरा नाम, कोरा कागज़, कसौटी, जैसे को तैसा, ज़मीन आसमान, जोरू का गुलाम, बंसी बिरजू, यह गुलिस्ताँ हमारा, हलचल, मेरे अपने, संजोग, बनफूल, आनन्द, दर्पण, खिलौना, जीवन मृत्यु, शिकार, सरस्वतीचन्द्र, मेहरबाँन या सिनेमांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली.