मिरज-पंढरपूर रस्त्यावरील धक्कादायक घटना
प्रतिनिधी / मिरज
पाईपलाईनसाठी खोदलेल्या 12 फूट खड्डयात उतरून टेलिकम्युनिकेशनची केबल टाकत असताना अंगावर मातीचा ढिगारा पडल्यानंतर जेसीबीच्या दातेरी जबड्यात अडकून जिओ कंपनीचा कर्मचारी जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी मिरज-पंढरपूर रस्त्यावर घडली. अभिषेक सावंत (वय 25, रा. कुपवाड) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे.
घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, मिरज-पंढरपूर रस्त्यावर तंदुरी ढाबा येथे महापालिकेचे ड्रेनेज पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु आहे. यासाठी सुमारे 8 ते 12 फुटांचा खड्डा खोदण्यात आला आहे. या खड्ड्यातून जिओ कंपनीची टेलिकम्युनिकेश केबल टाकण्याचे काम सुरू होते. अभिषेक सावंत हा केबल लाईन टाकण्यासाठी गुरुवारी सकाळी आला होता. केबल टाकण्यासाठी तो खड्ड्यात उतरला असता मातीचा ढिगारा त्याच्या अंगावर कोसळला. सदर तरुण ढिगाऱ्याखाली अडकला होता. सदरची घटना लक्षात येतात ड्रेनेज पाईपलाईन टाकण्यासाठी असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्याला वाचविण्यासाठी धाव घेतली. मात्र, मोठ्या ढिगाऱ्याखाली तो अडकला असल्याने जेसीबीच्या सहाय्याने पुन्हा माती बाजूला काढण्यासाठी प्रयत्न सुरू झाले.
माती बाजूला काढत असतानाच अभिषेक हा जेसीबीच्या दातेरी खोऱ्यात अडकला. खोरे मातीतून वर येताच सदर तरुणाचे पोटापासून दोन भाग झाले. मातीतच रक्ताची चिळकांडी उडाली. सदरचा प्रकार घडल्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी आक्रोश केला. मात्र तोवर अभिषेक हा ठार झाला होता. घडल्या प्रकाराबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पंचनामा सुरू आहे.