जेष्ठ समिक्षक चंद्रकांत जोशी यांचे मत
प्रतिनिधी / बेळगाव
चित्रकला ही व्यक्तीच्या अर्तमनातून उत्स्फूर्तपणे बाहेर येते. जे सुंदर आहे ते अधिक सुंदर करून रेखाटण्याची कला चित्रकार करत असतो. पाण्यासारखे प्रवाहीपण आणि पाण्याचा नितळपणा स्वच्छपणे ज्याला मांडता येतो तो खरा प्रतिभावंत होय असे विचार कोल्हापूरच्या कलानिकेतन संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत जोशी यांनी व्यक्त केले.
वरेरकर नाटय़ संघातर्फे शुक्रवार दि. 15 ते 17 जानेवारी दरम्यान संघाच्या के. बी. कुलकर्णी आर्ट गॅलरीमध्ये राजेशकुमार मौर्य, उदयोन्मुख चित्रकार हेमकुमार टोपीवाला यांच्या चित्रांची व नंम्रता मौर्य यांच्या फॅशन फोटोंचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन केल्यानंतर चंद्रकांत जोशी बोलत होते. व्यासपिठावर तरुण भारत समुहप्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकुर, मौर्य यांचे गुरू सी. एस. पंत अंजली पंत, नम्रता मौर्य, हेमकुमार टोपीवाला व जगदीश कुंटे उपस्थित होते.
चंद्रकांत जोशी पुढे म्हणाले राजेशकुमार यांनी आडनावाप्रमाणे चित्रकलेमध्ये साम्राज्य उभे केले आहे. सतत आकाशात झुलवत ठेवणाऱया या माणसाने रात्रीचा दिवस करून चित्रकला जोपासली आहे. कला ही आतुन बाहेर येते. चित्रकलेसाठी निर्सग वाचवावा लागतो. तो मनात झिरपावा लागतो. ज्ञानशाखेच्या अंतिम टोकाला गेल्यावर जे सापडले आहे ते मी देतो आहे अशी चित्रकाराची भावना असावी. यासाठी गुरूची शिकवणही महत्वाची कारण देव डोळे देतो, गुरू दृष्टी देतो. असेही चंद्रकांत जोशी यांनी नमुद केले.
राजेशकुमार मौर्य यांनी लहानपणापासून चित्रकलेची आवड असल्यामुळे याकडे वळलो. मात्र रात्रीच्यावेळीच चित्रे रेखाटण्यास वेळ मिळतो. त्यामुळे रात्री उगवणारी चांदणी हीच माझ्यासाठी अधिक प्रकाशदायी आहे. माझे गुरू सी. एस. पंत यांनी मला कागदावर पाणी कसे उतरवावे हे शिकविले. बेळगावला आल्यावर माझ्या चित्रकलेला प्रोत्साहन मिळाले आणि दीड वर्षात 400 हून अधिक चित्रे रेखाटली आहेत, असे सांगितले. सी. एस. पंत यांनी बेधडकपणे कागदावर रंग उधळण्याचे मौर्य यांचे धाडस कौतुकास्पद आहे. त्यांनी चित्रकलेत स्वतंत्र शैली जोपासली आहे. असे सांगितले.
अध्यक्षिय समारोप करताना किरण ठाकुर म्हणाले, मौर्य यांच्याकडे उत्तम रंगसंगतीची दृष्टी आहे. म्हणूनच विमानतळावर सुद्धा त्यांनी खूप आकर्षक चित्रे लावली आहेत. तरुणाईला संधी मिळावी यासाठी के. व्ही. कुलकर्णी आर्ट गॅलरी सुरू झाली आहे. कारण गुणांची कदर व्हावी. ही शिकवण आपल्याला कोरोनाने दिले आहे. कलाकारांनी या गॅलरीचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.
प्रारंभी जगदीश कुंटे यांनी स्वागत केले. वृषाली मराठे यांनी किरण ठाकुर यांचा, मनीषा सुभेदार यांनी सी. एस. पंत यांचा तर अंजली जोशी यांनी राजेशकुमार मौर्य यांचा सत्कार केला. याप्रसंगी बेळगावमधील चित्रकार आणि रसिक उपस्थित होते. सदर प्रदर्शन दि. 17 पर्यंत सकाळी 11 ते 7 या वेळेत सर्वांना खुले आहे.