कॅनडा देशात राहणारे लोकप्रिय गायक जसविंदरसिंग बैंस तथा ‘जैजी’ यांचे ट्विटर अकाऊंट बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. आपल्या गाण्यांमधून आणि संदेशांमधून ते स्वतंत्र खलिस्तानचा प्रचार करतात. विविध समाज घटकांमध्ये वैमनस्य निर्माण होईल, अशी विधाने करतात. त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे स्पष्टीकरणही देण्यात आले आहे.
जसविंदरसिंग हे ट्रान्स ऍटलांटिक सुपरस्टार आणि भांगडा का युवराज अशा दोन वेबसाईट्स चालवतात. त्यांच्या या वेबसाईट्सवरून देशविरोधी प्रचार केला जातो, असा आरोप ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या वेबसाईट्सवरही बंदी घालण्याची कारवाई सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या शेतकरी आंदोलनालाही त्यांनी प्रक्षोभक भाषेत पाठिंबा व्यक्त केला होता. आपल्या गायक म्हणून असलेल्या लोकप्रियतेचा गैरलाभ घेऊन ते देशविरोधी कारवाया करीत आहेत, असेही अनेकांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांच्यावर ट्विटर अकाऊंट बंद करण्याची कारवाई करण्यात आली आहे, असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे.