पाकिस्तानच्या कटाचा खुलासा : दहशतवाद्याने केली कार्यालयाची रेकी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. सुरक्षा यंत्रणांनी हे पाऊल त्यांच्या कार्यालयाच्या रेकीची चित्रफित मिळाल्यावर उचलले आहे. 6 फेब्रुवारी रोजी जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याला अटक करण्यात आली होती. त्याच्या चौकशीत ही चित्रफित समोर आली आहे. दहशतवाद्याला ही चित्रफित स्वतःच्या पाकिस्तानी हँडलरला पाठवायची होती. या हँडलरला डॉक्टर या नावाने तो ओळखायचा.
पाकिस्तानी हँडलर्सच्या निर्देशानुसार डोवाल यांचे कार्यालय तसेच काही अन्य महत्त्वाच्या इमारतींची रेकी केली होती अशी माहिती जैशचा दहशतवादी हिदायतुल्ला मलिकने दिली आहे.
हिदायतुल्ला मलिकला अनंतनागमध्ये अटक करण्यात आली होती. तो जैशच्या लष्कर-ए-मुस्तफा या शाखेचा प्रमुख आहे. अटकेवेळी दहशतवाद्याकडून मोठय़ा प्रमाणात दारूगोळा हस्तगत करण्यात आला होता. 24 मे 2019 रोजी इंडिगोच्या विमानाने श्रीनगर येथून दिल्लीत तो आला होता. मलिकने डोवाल यांचे कार्यालय तसेच सीआयएसएफच्या सुरक्षा व्यवस्थेचे चित्रण केले होते. सांबा सेक्टरमधील सीमाक्षेत्राची रेकी त्याने समीर अहमद डारसह केली होती. समीरला पुलवामा हल्ल्याप्रकरणी मागील वर्षी अटक करण्यात आली होती.
आत्मघाती हल्ल्याचा कट
मे 2020 मध्ये आत्मघाती हल्ल्यासाठी सॅन्ट्रो कार देण्यात आली होती. याकरता मलिकने इरफान ठोकार, उमर मुश्ताक आणि रईस मुस्तफासह एका बँकेच्या कॅश व्हॅनमधून 60 लाख रुपये लुटले होते. मलिकने चौकशीत पाकिस्तानातील 10 लोकांचे संपर्क क्रमांक, टोपणनावेही सांगितली आहे. याच तपशीलाच्या आधारावर त्याच्या दोन हस्तकांना कंठस्नान घालण्यात आले होते.