चार दहशतवाद्यांना अटक- स्वातंत्र्यदिनी हल्ल्याचा कट उधळला
श्रीनगर / वृत्तसंस्था
काश्मीरमधील सुरक्षा यंत्रणांनी शनिवारी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या मॉडय़ूलचा पर्दाफाश केला. जम्मू-काश्मीर पोलिसांनी शनिवारी चार दहशतवादी आणि त्यांच्या साथीदारांना अटक केली आहे. अटकेतील दहशतवाद्यांच्या ताब्यातून शस्त्रे आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यासाठी मोटारसायकल आयईडीचा वापर करण्यात येणार होता. सदर संशयित स्वातंत्र्यदिनी हल्ला करण्याच्या तयारीत होते. ड्रोनद्वारे सोडण्यात आलेली शस्त्रास्त्रे गोळा करून ते काश्मीरमधील आपल्या साथीदारांपर्यंत पोहोचवणार होते. तसेच ते 15 ऑगस्टपूर्वी जम्मूमध्ये आयईडी स्फोट करण्यासह देशातील काही महत्त्वाच्या ठिकाणी हल्ला करण्याची योजना आखत होते, असे प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे.
पोलिसांनी सर्वप्रथम पुलवामा येथील प्रचू परिसरातील मुंतझीर मंजूरला अटक केली. त्याच्या ताब्यातून एक पिस्तूल, एक मॅगझिन, आठ जिवंत राऊंड आणि दोन चिनी हँड ग्रेनेड जप्त करण्यात आले. काश्मीर खोऱयात शस्त्रे नेण्यासाठी वापरला जाणारा एक ट्रकही जप्त करण्यात आला आहे. मुंतझीर मंजूरच्या अटकेनंतर ‘जैश’चे आणखी तीन साथीदारांनाही पकडण्यात आले.
शोपियांमधून तौसिफ अहमद शाह नावाच्या एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडे जम्मूमध्ये राहण्याची सोय करणे आणि नंतर जम्मूमध्ये आयईडी स्फोटासाठी वापरली जाणारी जुनी मोटरसायकल खरेदी करण्याचे काम देण्यात आले होते. या हल्ल्यासाठी वापरण्यात आलेला आयईडी ड्रोनद्वारे सोडण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले. पुलवामातून अटक करण्यात आलेला चौथा दहशतवादी जहाँगीर अहमद फळ व्यापारी म्हणून काम करत होता. पण तो भारतातील तरुणांची ‘जैश’मध्ये भरती करत होता, असे पोलिसांनी सांगितले.
रामजन्मभूमीही हिटलिस्टवर
पाकिस्तानातील जैश कमांडर मुनाझीर उर्फ शाहिद याने त्याला पंजाबमध्ये ड्रोनद्वारे सोडण्यात आलेली शस्त्रास्त्रे गोळा करण्यास सांगितले होते. तसेच जैश कमांडरने त्याला पानिपत तेल रिफायनरीमध्ये रेकी करण्यास सांगितले होते. त्याने रिफायनरीचे व्हिडीओ पाकिस्तानमधील त्याच्या कमांडरला पाठवल्याची कबुली दिली आहे. हे काम झाल्यानंतर त्यानंतर त्याला अयोध्या रामजन्मभूमीचे सैनिकी दृष्टीने सर्वेक्षण करण्याचे काम देण्यात आले होते, असे चौकशीदरम्यान एका दहशतवाद्याने पोलिसांना सांगितले.