न्यूझीलंडविरुद्ध एकतर्फी मालिकाविजयानंतर अनुभवी इंग्लिश फलंदाज जो रुटचे प्रतिपादन
लीड्स / वृत्तसंस्था
इंग्लिश फलंदाज जो रुटने संघसहकारी जॉनी बेअरस्टोच्या जिगरबाज खेळीची मुक्तकंठाने प्रशंसा केली. इंग्लंडने हेडिंग्लेमधील तिसऱया व शेवटच्या कसोटीत 7 गडी राखून एकतर्फी विजय संपादन केला. त्यानंतर रुट माध्यमांशी बोलत होता. स्वतः जो रुट (नाबाद 86) व जॉनी बेअरस्टो (नाबाद 71) यांनी या विजयात सिंहाचा वाटा उचलला.
यजमान इंग्लंडने पूर्ण सामन्यात उत्तम वर्चस्व गाजवले. न्यूझीलंडने 296 धावांचे टार्गेट दिले असले तरी इंग्लिश फलंदाजांनी देखील तोडीस तोड प्रत्युत्तर दिले आणि तिसरी कसोटी 7 गडय़ांनी जिंकत मालिका 3-0 अशा एकतर्फी फरकाने खिशात घातली.
‘आम्ही ती लढत 50 षटकांची असल्याप्रमाणे खेळलो. बेअरस्टोचे फटके उत्तम लागले आणि त्याच्या फलंदाजीचा आपण सर्वांनी आनंद लुटला. प्रदीर्घ कालावधीपासून बेअरस्टो सातत्यपूर्ण योगदान देत आला असून यापुढेही तो यात सातत्य राखेल, अशी अपेक्षा आहे’, असे रुट याप्रसंगी म्हणाला.
‘कोणताही खेळाडू आपल्यासमोर जी स्थिती आहे, त्याप्रमाणे आपल्या खेळात लवचिक बदल करत असतो. बेअरस्टोने देखील या मालिकेत तेच केले. आम्ही सर्व संघसहकाऱयांनी या मालिकाविजयाचा विशेष आनंद लुटला’, असे त्याने पुढे नमूद केले.
वास्तविक, हेडिंग्ले येथील तिसऱया कसोटी सामन्यात 296 धावांचा पाठलाग करताना सलामीवीर ऍलेक्स लीस केवळ 9 धावांवर धावचीत झाल्याने इंग्लंडची खराब सुरुवात झाली होती. नंतर झॅक क्राऊली व ऑलि पोप यांनी 34 धावांची भागीदारी साकारली. फिरकीपटू मायकल ब्रेसवेलने क्राऊलीला 25 धावांवर कर्णधार विल्यम्सनकरवी बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर पोप व रुट यांनी त्यांनी मालिकेतील सातत्य येथेही कायम राखत 134 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी साकारली. साऊदीने पोपला त्रिफळाचीत केले. मात्र, तोवर त्याने आपल्या 108 चेंडूत 12 चौकारांसह 82 धावांच्या खेळीसह आपली जबाबदारी चोख पार पाडली होती.
पुढे, इंग्लंडची 3 बाद 185 अशी स्थिती असताना रुट व बेअरस्टो ही जोडी क्रीझवर जमली आणि त्यांनी विजयावर शिक्कामोर्तब करुन देत एकतर्फी मालिकाविजय मिळवून दिला. रुटने संयमी फलंदाजीवर भर दिला तर बेअरस्टोने मात्र दुसऱया डावातही बेधडक फलंदाजीवर भर दिला. त्याने आपले अर्धशतक तर अवघ्या 30 चेंडूतच साजरे केले होते. रुट व बेअरस्टो यांनी 111 धावांची अभेद्य भागीदारी साकारली. 71 धावांच्या खेळीसाठी बेअरस्टोने अवघे 44 चेंडू घेतले.
कसोटी मालिकेत सर्वोत्तम स्ट्राईक रेट
फलंदाज / प्रतिस्पर्धी / वर्ष / धावा / चेंडू / स्ट्राईक रेट
जॉनी बेअरस्टो (इंग्लंड) / न्यूझीलंड / 2022 / 394 / 328 / 120.12
बेन स्टोक्स (इंग्लंड) / द. आफ्रिका / 2015-16 / 411 / 377 / 109.01
विरेंद्र सेहवाग (भारत) / श्रीलंका / 2009 / 491 / 454 / 108.14
शिखर धवन (भारत) / श्रीलंका / 2017 / 358 / 342 / 104.67
डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया) / पाकिस्तान /2016-17 / 356 / 343 / 103.79.