वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेत जॉन्सन अँड जॉनस कंपनीची कोरोनावरील लस ‘जॅनसेन’ला आपत्कालीन मंजुरी मिळाली आहे. मॉडर्ना आणि फायजरनंतर देशात मंजुरी मिळविणारी ही तिसरी लस ठरली आहे. अमेरिकेतील ही पहिली एकच डोस असणारी लस आहे.
अमेरिकन फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशनच्या (एफडीएफ) सल्लागार मंडळाने शुक्रवारी या लसीच्या शिफारसीसाठी मतदान केले होते. यात 22 सदस्यांनी लसीच्या बाजूने मतदान केले. तर विरोधात एकही मत पडले नव्हते.
44 हजार जणांवर परीक्षण
जॉन्सन अँड जॉन्सनीच्या लसीचे परीक्षण अमेरिका, दक्षिण आफ्रिका तसेच दक्षिण अमेरिकेतील 44 हजारांपेक्षा अधिक लोकांवर करण्यात आले आहे. याची प्रभावोत्पादकता 66.1 टक्के राहिली आहे.
पुरवठा कमी, मागणी अधिक
सद्यकाळात देशात लसीची मागणी पुरवठय़ापेक्षा खूपच अधिक आहे. आगामी काळातही पुरवठय़ाची स्थिती सुधारण्याची चिन्हे नाहीत. पण जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसीला मंजुरी मिळाल्याने लसीकरणात मदत होणार आहे. ही लस 18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांना देण्यात येणार आहे. अमेरिकेत आतापर्यंत 7 कोटींहून अधिक लोकांना लस देण्यात आली आहे.