वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतात कोरोना लसींकरता जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने अर्ज केला होता. पण कंपनीने हा अर्ज आता मागे घेतला आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाच्या सूत्रांकडून ही माहिती देण्यात आली आहे. अशा स्थितीत भारतातील कोरोना लसीकरणाच्या मोहिमेतील विदेशी लसीच्या ‘एंट्री’ला आणखी एक मोठा झटका बसला आहे.
जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीने स्वतःचा अर्ज मागे का घेतला याचे कुठलेच ठोस कारण समोर आलेले नाही. भारतात सध्या केवळ एका विदेशी लसीचा वापर केला जात आहे. रशियाची स्पुतनिक-व्ही ही लस भारतीयांकरता उपलब्ध करण्यात आली आहे.
याशिवाय भारतात मॉडर्ना, फायजर समवेत अन्य लसींच्या ‘एंट्री’वर काम सुरू आहे. पण आतापर्यंत यातील कुठल्याच लसीला मंजुरी मिळालेली नाही. भारत आतापर्यंत केवळ 3 लसींचा वापर करत असून यात कोविशील्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पुतनिक-व्ही सामील आहे.
जॉन्सन अँड जॉन्सन ही जगातील प्रख्यात कंपनी असून ती वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित उत्पादनांची निर्मिती करते. कंपनीनुसार तिच्या कोरोनावरील लसीचा सिंगल डोस 85 टक्के प्रभावोत्पादक आहे. ही लस दक्षिण आफ्रिका, ब्राझील व्हेरियंटवरही प्रभावी असल्याचा कंपनीचा दावा आहे.
अमेरिकेच्या जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने एप्रिल महिन्यात भारतातील लसीच्या परीक्षणासाठी अर्ज केला होता. पण त्यादरम्यान अमेरिकेत रक्ताच्या गुठळय़ा होण्याच्या तक्रारी आल्यावर याचे परीक्षण रोखण्यात आले होते.