ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोनाविरुद्धच्या युद्धात भारताला लवकरच आणखी एक लस मिळू शकते. अमेरिकेची फार्मा कंपनी ‘जॉन्सन अँड जॉन्सन’ने आपल्या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी भारत सरकारकडे परवानगी मागितली आहे. विशेष म्हणजे कोरोनाविरोधात या लसीचा एकच डोस पुरेसा आहे.
भारतात सध्या भारत बायोटेकची ‘कोवॅक्सिन’, सीरमची ‘कोविशिल्ड’ आणि रशियाच्या ‘स्पुतनिक-व्ही’ लसींचा वापर केला जात आहे. अशा परिस्थितीत जर भारत सरकारने जॉन्सन आणि जॉन्सन कंपनीला लसीसाठी परवानगी दिली, तर ती कोरोनाविरुद्ध वापरली जाणारी देशातील चौथी लस ठरेल. या लसीचा फक्त एक डोस पुरेसा असणार आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत देशातील 49.5 कोटी लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे.