मार्गताम्हानेतील सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणाची ऑस्ट्रेलिया वारी निराशाजनक
प्रशांत चव्हाण/ मार्गताम्हाने
मलेशियानजीकच्या बृणयी या छोटय़ा देशात गेली 15 वर्षे सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून उत्तम जॉब केला आणि काही वर्षातच तेथील जॉबही गेला. अशावेळी नव्या जॉबच्या शोधात फिरणाऱया एका सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणाला थेट ऑस्ट्रेलियात जॉबची संधी मिळाली. मात्र याची खात्री करण्यासाठी गेला आणि कोरोना रोगाच्या प्रादूर्भावामुळे अचानक जाहीर लॉकडाऊनमध्ये अडकला तो आजतागायत. चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाने येथील प्रशांत विजय चव्हाण या तरुणाची ही कहाणी त्याच्या भविष्याच्या करिअरची वाट खऱयाअर्थाने लॉकडाऊनच ठरली आहे.
मूळ मुंबईतच लहानाचा मोठा होऊन आपल्या करिअरची स्वतंत्र वाट चोखळणारा व परदेशात नोकरी करण्याची स्वप्ने उराशी बाळगणाऱया प्रशांत याने मुंबईपेक्षा आपले करिअर परदेशात अधिक चांगले होईल, या आशेने प्रयत्न सुरु केले होते. 15 वर्षांपूर्वी त्याला आपल्या करिअरची दिशा सापडली व तशी संधीही मिळाली. मलेशियानजीकच्या बृणयी या छोटय़ा देशात त्याच्या शैक्षणिक पात्रतेनुसार चांगल्या पगाराचा जॉबही मिळाला. पत्नी व दोन मुलगे असे कुटुंब घेऊन तो त्या देशात स्थायिक झाला होता. त्याची पत्नीही सॉफ्टवेअर इंजिनिअर असल्याने तिलाही तिच्या मनाप्रमाणे जॉब मिळाला होता. एकंदरीत सर्वकाही सुरळीत असताना अचानक प्रशांतचा जॉब गेला. त्यामुळे तो निराश झाला. अशाही स्थितीत खचून न जाता त्याने परदेशातील जॉबचे आपले प्रयत्न सुरुच ठेवले होते. अशावेळी प्रशांतला ऑस्ट्रेलियात जॉबची संधी मिळाली. यासाठी तो संबंधित कंपनी व्यवस्थापनाला भेटण्यासाठी बृणयी देशातून ऑस्ट्रेलियात गेला.
दरम्यान, नजीकच्या मलेशिया देशासह इतर सर्व देशांमध्ये कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव धुमाकूळ घालत असताना निसर्गसंपन्न ऑस्ट्रेलिया देशालाही कोरोनाचा विळखा बसण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे तेथेही लॉकडाऊन जाहीर झाले आणि प्रशांत यामध्ये अडकून पडला. गेले दीड महिना लॉकडाऊन कालावधीत प्रशांत पेईंग गेस्ट म्हणून तेथेच राहिला आहे. मात्र त्याच्या कुटुंबियांची ताटातूट त्याला स्वस्थ बसू देत नसल्याचे त्याने सांगितले. पत्नी, दोन मुले बृणयी देशात, तर प्रशांत ऑस्ट्रेलियात अशी उलटी स्थिती त्याच्याबाबतीत घडून आली आहे. त्याचे आई-वडील गावी मार्गताम्हाने येथे असून त्यांच्यापासून मुलगा दूर असल्याची खंतही लागून आहे. ऑस्ट्रेलियात सध्या कोरोनाबाधितांची संख्या 7 हजारांचा आसपास असून सर्व व्यवहार ठप्प आहेत. लॉकडाऊन असल्याने प्रशांतला ऑस्ट्रेलियातून अद्यापही बाहेर पडता आलेले नाही. आपली पत्नी, मुलगे नजीकच्या बृणयी देशात, तर आपण ऑस्ट्रेलियात अशाही स्थितीत कुटुंबियांशी त्याचा संवाद नियमित सुरु आहे.
ऑस्ट्रेलियात जॉब मिळण्याची संधी केवळ लॉकडाऊनमुळे जाण्याची शक्यता प्रशांतने व्यक्त केली आहे. कारण जगावर आलेले आर्थिक मंदीचे ढग निवळण्यास खूप कालावधी लागणार आहे. अगोदरच जॉब गेला आहे. त्यातच पत्नीच्या जॉबवरच प्रशांतचे सर्वकाही अवलंबून आहे. एकीकडे जॉबची चिंता, तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे अडकून पडल्याने कुटुंबियांची वाटणारी काळजी अशा दुहेरी कात्रीत सापडल्याचे त्याने सांगितले.
प्रतिक्रिया – गावाला येण्याची तीव्र इच्छा
नोकरीसाठी प्रशांत व त्याची पत्नी, मुले परदेशात असली तरी त्यांची गावाची ओढ कायम राहिली आहे. उन्हाळय़ाची सुट्टी, तर त्यांना परदेशात स्वस्थ बसून देत नाही. यावर्षीही हे कुटुंब गावाला येणार होते. मात्र कोरोनामुळे दोन वेगवेगळ्या देशात तो व त्याची पत्नी, मुले अडकून पडल्याने गावाला येण्याच्या त्याच्या या इच्छेवर पाणी फेरले गेल्याचे प्रशांतने सांगितले.