वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जॉयआलुक्कास ग्रुपचे चेअरमन श्री.जॉय आलुक्कास यांनी आपल्या प्रगतीत अजून एक महत्त्वाचा ठप्पा गाठला. ते ओमानचे दीर्घकालीन रहिवासी कार्ड मिळवणारे पहिले प्रवासी गुंतवणूकदार ठरले आहेत. इतर 21 गुंतवणूकदारांसह जॉय आलुक्कास यांना व्यापार, उद्योग आणि गुंतवणूक प्रोत्साहन मंत्री माननीय कैस बिन मोहम्मद अल युसुफ यांच्याकडून मस्कत येथे झालेल्या एका समारंभात दीर्घकालीन रहिवासी कार्ड देण्यात आले.
या सन्मानामुळे आनंदित झालेले श्री. जॉय आलुक्कास म्हणाले, माझ्या ओमानमधील गेल्या दशकभरातल्या वाटचालीतला हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. या प्रदेशातील सर्वोत्तम गुंतवणूकदारांबरोबर हा सन्मान मिळणे भाग्याचे आहे. हा सन्मान दिल्याबद्दल मी व्यापार मंत्रालय आणि ओमानी अधिकाऱयांचे आभार मानतो. यामुळे आमचा ओमानबद्दलचा दृष्टीकोन अजून मजबूत झाला आहे आणि या भागात आक्रमक पद्धतीने गुंतवणूक करण्यासाठी आम्हाला अधिक आत्मविश्वास मिळाला आहे. एक ग्रुप म्हणून, आम्ही ओमानी नागरिकांसाठी नोकरीच्या अधिक संधी निर्माण करू आणि अर्थव्यवस्थेमध्ये विविधता आणण्यासाठी योगदान देऊ.
हा पुढाकार ओमान व्हिजन 2040 चा भाग असून मान्यताप्राप्त व्यावसायिक ग्रुप्सकडून गुंतवणूक मिळवून तेलाच्या संसाधनांच्या पलीकडे जाऊन अर्थव्यवस्थेमध्ये विविधता आणण्याच्या आणि ओमानी नागरिकांसाठी नोकरीच्या अधिक संधी निर्माण करण्याच्या प्रयत्नांचा भाग आहे. जॉयआलुक्कास ग्रुपने ओमानमध्ये लक्षणीय गुंतवणूक केली आहे, त्यांच्या ओमानमधील व्यवसायांमध्ये जॉयआलुक्कास ज्वेलरी आणि जॉयआलुक्कास एक्स्चेंजचा समावेश आहे. ग्रुपचे ओमानमधील काम हे मध्य पूर्व भागातील उद्योगांमध्ये महत्त्वाचे योगदान आहे.