वृत्तसंस्था/ सिडनी
ऑस्ट्रेलियन क्रिकेट निवड समिती प्रमुखपदी माजी कर्णधार जॉर्ज बेली यांची नियुक्ती केल्याची घोषणा क्रिकेट ऑस्ट्रेलियाने रविवारी केली. यापूर्वीचे क्रिकेट निवड समिती प्रमुख ट्रेव्हर हॉन्स हे निवृत्त झाल्याने त्यांच्या जागी बेली यांची निवड करण्यात आली.
गेल्या फेब्रुवारीमध्ये 38 वर्षीय बेली ऑस्ट्रेलियाच्या निवड समिती पॅनेलमध्ये दाखल झाले होते. येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणारी आयसीसी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा त्याचप्रमाणे मायदेशात होणारी ऍशेस मालिका आणि उपखंडातील ऑस्ट्रेलियन संघाच्या विदेशी दौऱयासाठी संघ निवडीची जबाबदारी आता बेली यांच्यावर राहील. ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीमध्ये हॉन्स 1991 साली पहिल्यांदा दाखल झाले होते. त्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली ऑस्ट्रेलियन संघाने रिकी पाँटींगच्या नेतृत्वाखाली सलग 21 वनडे सामने जिंकले होते. हॉन्स यांच्या निवड समिती प्रमुखपदाच्या पहिल्या टप्प्यात ऑस्ट्रेलियन संघाने सलग पाचवेळा ऍशेस मालिका जिंकल्या आहेत. ऑस्ट्रेलियन संघाने सलग 16 कसोटी सामने जिंकण्याचा विक्रमही केला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाने 1999 आणि 2003 साली सलग दोनवेळा विश्वचषक स्पर्धा जिंकली होती.