वृत्तसंस्था / लंडन
जॉर्डनचा 19 वर्षीय युवा मुष्टीयोद्धा रशीद अल स्वेसेतचे मेंदूला झालेल्या दुखापतीमुळे निधन झाले. पोलंडमध्ये झालेल्या विश्व युवा आंतरराष्ट्रीय मुष्टीयुद्ध स्पर्धेत खेळताना रशीदच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली होती. या दुखापतीनंतर त्याच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
16 एप्रिल रोजी रशीदला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर डॉक्टरांनी त्याच्या मेंदूवर शस्त्रक्रिया केली होती पण यानंतर आठवडय़ापेक्षा अधिक कालावधी झाल्यानंतर त्याच्या प्रकृतीमध्ये अचानक बिघाड झाल्याने अखेर त्याचा मृत्यू झाला. पोलंडमध्ये झालेल्या विश्व युवा आंतरराष्ट्रीय मुष्टीयुद्ध स्पर्धेत 81 किलो गटात जॉर्डनचा रशीद आणि इस्टोनियाचा अँटोन यांच्यात लढत आयोजित केली होती. या लढतीतील तिसऱया फेरीत रशीदला डोक्याला दुखापत झाल्याने तो खाली कोसळला होता. जॉर्डन ऑलिंपिक समितीतर्फे रशीदच्या दुर्दवी अकाली निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात आला.