वृत्तसंस्था/ पॅरीस
सर्बियाचा टॉप सीडेड पुरूष टेनिसपटू नोव्हॅक जोकोविचने स्वीसचा अनुभवी टेनिसपटू रॉजर फेडररच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे. एटीपीच्या क्रमवारीत यापूर्वी फेडररने 310 आठवडे अग्रस्थान राखण्याचा विक्रम केला होता. आता जोकोविचने या क्रमवारीत अग्रस्थान 310 आठवडे राखत फेडररच्या या विक्रमाशी बरोबरी साधली आहे.
गेल्या महिन्यात सर्बियाच्या जोकोविचने ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेचे नवव्यांदा जेतेपद मिळविले. त्याने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीत आतापर्यंत 18 ग्रॅण्ड स्लॅम अजिंक्यपदे मिळविली आहेत. सोमवारी घोषित करण्यात आलेल्या एटीपीच्या ताज्या मानांकन यादीत सर्बियाच्या जोकोविचने 12030 गुणांसह पहिले, स्पेनच्या नदालने 9850 गुणांसह दुसरे, रशियाच्या मेदव्हेदेवने 9735 गुणांसह तिसरे, ऑस्ट्रीयाच्या थिएमने 9125 गुणांसह चौथे, स्वीसच्या फेडररने 6630 गुणांसह पाचवे, ग्रीकच्या सित्सिपसने 6595 गुणांसह सहावे, जर्मनीच्या व्हेरेव्हने 5615 गुणांसह सातवे, रशियाच्या रूबलेव्हने 4609 गुणांसह आठवे, अर्जेंटिनाच्या शुवार्त्झमनने 3480 गुणांसह नववे तर इटलीचा बेरेटेनीने 3480 गुणांसह दहावे स्थान मिळविले आहे.