ऑस्ट्रेलियन टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेतील सहभागाबाबतही प्रश्नचिन्ह
सिडनी / वृत्तसंस्था
जागतिक क्रमवारीतील अव्वलमानांकित नोव्हॅक जोकोविचने 16 देशांचा सहभाग असलेल्या 2022 एटीपी चषक स्पर्धेतून माघार घेतली. स्पर्धेच्या आयोजकांनी बुधवारी ही घोषणा केली. अर्थात, जोकोविच खेळणार नसला तरी जागतिक क्रमवारीतील 33 वा मानांकित डय़ूसन लाजोव्हिकमुळे सर्बियाचे स्पर्धेत आव्हान असणार आहे. दरम्यान, जोकोविचने स्पर्धेतून अंग बाहेर काढून घेतल्यानंतर तो हंगामातील पहिल्या ऑस्ट्रेलियन टेनिस ग्रँडस्लॅममध्ये खेळणार का, याबद्दलही साशंकता निर्माण झाली आहे.
आपण पूर्ण लसीकरण करुन घेतले आहे का, याची माहिती देण्यासाठी जोकोविचने सातत्याने नकार दिला असून यामुळे हा 9 वेळचा ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम जेता मेलबर्नमध्ये असेल का, हे पहावे लागेल. ऑस्ट्रेलियात पोहोचण्यासाठी त्याने व त्याच्या पथकातील सर्व सदस्यांचे पूर्ण लसीकरण झालेले असणे सक्तीचे असेल, हे उल्लेखनीय आहे. आगामी ऑस्ट्रेलियन टेनिस ग्रँडस्लॅम दि. 17 जानेवारीपासून खेळवली जाईल.
2022 एटीपी कप स्पर्धेत ब गटातील डॉमिनिक थिएम व डेनिस नोव्हॅक यांनी माघार घेतली असल्याने ऑस्ट्रियाऐवजी फ्रान्स सहभागी होईल, असेही आयोजकांनी बुधवारी जाहीर केले. जागतिक क्रमवारीतील 35 वा मानांकित आंद्रेय हय़ुबर फ्रान्स संघाचे नेतृत्व भूषवेल. ऑर्थर रिंडरनेच, एदुआर्द रॉजर-व्हॅसेलिन व फॅब्राईस मार्टिन यांचा प्रेंच संघात समावेश असणार आहे.
रशियाच्या आंद्रेय रुबलेव्ह, ऍस्लन कॅरात्सेव्ह व इव्हजेन्सी डॉन्स्कॉय यांनी माघार घेतली असून कार्लोस्की स्पर्धेसाठी फ्रान्समध्ये दाखल होईल. अमेरिकेच्या ऑस्टिन क्रॅजिसेकनेही माघार घेतली असून त्याच्याऐवजी पर्यायी खेळाडू दिला जाणार नाही. यंदाची एटीपी चषक स्पर्धा सिडनी ऑलिम्पिक पार्कमधील केन रोझवाल एरेना व क्युडोस बँक एरेना येथे शनिवारपासून खेळवली जाणार आहे.