लंडन : येत्या सोमवारपासून सुरू होणाऱया विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत सर्बियाचा टॉप सिडेड आणि या स्पर्धेतील विद्यमान विजेता नोव्हॅक जोकोविचची सलामीची लढत ब्रिटनच्या नवोदित वाईल्ड कार्डधारक जॅक ड्रेपरशी होणार आहे. या स्पर्धेतील महिला विभागातील विद्यमान विजेती रुमानियाची सिमोना हॅलेपने दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतल्याची घोषणा शुक्रवारी केली आहे.
सर्बियाचा टॉप सिडेड जोकोविचने 2021 टेनिस हंगामातील पहिल्या 6 महिन्यांच्या कालावधीत ऑस्ट्रेलियन आणि प्रेंच ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे मिळविली आहेत. आतापर्यंत जोकोविचने 19 ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे पटकावली आहेत. 2020 साली कोरोना महामारीमुळे विम्बल्डन टेनिस स्पर्धा रद्द करण्यात आली होती.