दुबई/ वृत्तसंस्था
एटीपी टूरवरील येथे सुरु असलेल्या दुबई खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत सर्बियाचा टॉप सिडेड टेनिसपटू जोकोविचला उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात झेकच्या जिरी व्हेसेलीकडून पराभवाचा धक्का बसला. या पराभवामुळे त्याचे एटीपीतील अग्रस्थान गमविले असून रशियाच्या मेदव्हेदेवला त्याचे अग्रस्थानावर मिळाले आहे.
गुरुवारी झालेल्या सामन्यात झेकच्या व्हेसेलीने जोकोविचचा 6-4, 7-6 (7-4) असा पराभव केला. या पराभवामुळे रशियाच्या मेदव्हेदेवला येत्या सोमवारी घोषित होणाऱया एटीपीच्या ताज्या मानांकन यादीत अग्रस्थान मिळणार आहे. 2004 पासून एटीपीच्या मानांकनात मेदव्हेदेवला प्रथमच अग्रस्थानाची संधी मिळणार आहे. यापूर्वी जोकोविच, नदाल, फेडरर आणि अँडी मरे यांच्यातच अग्रस्थानासाठी चुरस पहावयास मिळत असे. जोकोविचने तब्बल विक्रमी 361 आठवडे आपले अग्रस्थान राखले होते.
दुबई स्पर्धेतील दुसऱया एका सामन्यात रशियाच्या रुबलेव्हने उपांत्य फेरी गाठताना अमेरिकेच्या मॅकडोनाल्डचा 2-6, 6-3, 6-1, पाचव्या मानांकीत हुरकेजने सिनेरचा 6-3, 6-3 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली आहे.