वृत्तसंस्था/ बेलग्रेड
येथे सुरू झालेल्या बेलग्रेड ओपन टेनिस स्पर्धेत सर्बियाच्या अग्रमानांकित नोव्हॅक जोकोविचने जर्मनीच्या मॅट्स मोरेंगवर सरळ सेट्सनी विजय मिळवित उपांत्यपूर्व फेरी गाठली. पुढील आठवडय़ात प्रेंच ओपन ग्रँडस्लॅम सुरू होत असून त्याच्या तयारीसाठी जोकोविच या स्पर्धेत खेळत आहे.
34 वर्षीय जोकोविचने सामना जिंकला असला तरी जागतिक क्रमवारीत 253 व्या स्थानावर असणाऱया मॅट्सने त्याला संघर्ष करण्यास भाग पाडले. जोकोविचने ही लढत 6-2, 7-6 (7-4) अशी जिंकून आगेकूच केली. ही लढत सुमारे पावणेदोन तास रंगली होती. नऊ दिवसांपूर्वी इटालियन ओपन स्पर्धेच्या अंतिम लढतीत स्पेनच्या राफेल नदालकडून पराभूत झाल्यानंतर जोकोविचचा हा पहिलाच सामना होता. पहिल्या सेटमध्ये त्याने पूर्ण वर्चस्व राखले होते. पण दुसऱया सेटमध्ये मॅट्सने दोनदा त्याची सर्व्हिस भेदली होती. पण अखेर जोकोविचने टायब्रेकमध्ये बाजी मारली. त्याची उपांत्यपूर्व लढत अर्जेन्टिनाच्या फेडरिको कोरियाशी होणार आहे. जोकोविचने आतापर्यंत 18 ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे मिळविली असून पुढील आठवडय़ात तो 19 वी ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे.