वृत्तसंस्था/ रोम
नोव्हॅक जोकोविचने इटालियन ओपन स्पर्धेतील शानदार कामगिरी पुढे चालू ठेवत 60 वा विजय मिळविताना असलन कारात्सेवचा पराभव केला. महिलांमध्ये टय़ुनिशियाच्या ऑन्स जेबॉरनेही दुसरी फेरी गाठली आहे. अमेरिकन चॅम्पियन एम्मा रॅडुकानूला मात्र पाठदुखीमुळे माघार घ्यावी लागली तर ओस्टापेन्कोला पराभवाला सामोरे जावे लागले.
जोकोविचने कारात्सेववर 6-3, 6-2 असा सहज विजय मिळविला. त्याने या स्पर्धेत आजवर उपांत्यपूर्व फेरीच्या आधी एकदाही पराभव स्वीकारलेला नाही. त्याने आतापर्यंत सहावेळा ही स्पर्धा जिंकलेली आहे. तो 1000 सामने जिंकण्याच्या मार्गावर असून यासाठी त्याला आणखी तीन सामने जिंकावे लागणार आहेत. तो सध्या अग्रस्थानावर असून हे स्थान कायम राखण्यासाठी त्याला येथे किमान उपांत्य फेरीपर्यंत मजल मारावी लागेल. त्याची पुढील लढत त्याच्याच देशाच्या लॅजलो डेअर किंवा स्विसच्या वावरिंका यापैकी एकाशी होणार आहे.
बल्गेरियाच्या ग्रिगोर डिमिट्रोव्हने आगेकूच करताना अमेरिकेच्या ब्रँडन नाकाशिमाचा 6-3, 6-4 असा पराभव करीत दुसरी फेरी गाठली. त्याची पुढील लढत ग्रीसच्या स्टेफानोस सित्सिपसशी होईल. अर्जेन्टिनाच्या दिएगो श्वार्ट्झमनला मिओमिर केसमॅनोविकवर 6-2, 3-6, 7-6 (7-3) असा विजय मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागला. ब्रिटनच्या नवव्या मानांकित कॅमेरॉन नोरीने स्थानिक खेळाडू लुका नार्डीचा 6-4, 6-4 असा पराभव केला. त्याची लढत मारिन सिलिकशी होईल.
जेबॉर विजयी, रॅडुकानू, टोर्मोची माघार
जेबॉरने सोराना सिर्स्टियाचा 6-0, 7-6 (7-1) असा पराभव करीत दुसरी फेरी गाठली. या दोघींत आतापर्यंत तीनवेळा गाठ पडली असून जेबॉरने तिच्यावर मिळविलेला हा पहिला विजय आहे. तिची पुढील लढत ऍला टोमलानोविकशी होणार आहे. अमेरिकन ओपन चॅम्पियन रॅडुकानूला पाठदुखीचा त्रास होऊ लागल्याने तिने बियान्का अँड्रीस्क्यूविरुद्ध होणाऱया पहिल्या सामन्यातून माघार घेतली. मागील आठवडय़ापासूनच तिला पाठदुखीचा त्रास सुरू असून त्यातून ती अद्याप सावरलेली नाही. अँड्रीस्क्यूने पहिला सेट 6-2, असा जिंकल्यानंतर दुसऱया सेटमध्ये ती 2-1 अशी आघाडीवर असताना रॅडुकानूने माघारीचा निर्णय घेतला. स्पेनच्या सारा सोरिबेस टोर्मोची स्थितीही अशीच झाली. नुरिया पेरिझस डायझविरुद्ध खेळताना ती 6-1, 4-3 अशी आघाडीवर होती. पण तिने पाठदुखीमुळे माघार घेतल्याने डायझला दुसऱया फेरीत स्थान मिळाले.
ओस्टापेन्को पराभूत
अन्य एका सामन्यात 13 व्या मानांकित जेसिका पेगुलाने ल्युडमिला सॅमसोनोव्हावर 4-6, 6-3, 6-4 अशी मात केली. ऍनहेलिना कॅलिनिनाशी तिची पुढील लढत होईल. माजी पेंच विजेत्या 11 व्या मानांकित एलेना ओस्टापेन्कोचे आव्हान मात्र अमेरिकेच्या लॉरेन डेव्हिसने 6-2, 6-3 असे संपुष्टात आणत दुसरी फेरी गाठली. अमेरिकेच्या अमांदा ऍनिसिमोव्हाला दुसरा सेट एकतर्फी गमवावा लागला असला तरी त्यातून सावरत झेकच्या तेरेझा मार्टिनकोव्हावर तिने 6-2, 0-6, 6-4 अशी मात केली. पुढील फेरीत बेलिंडा बेन्सिकशी तिची गाठ पडणार आहे.