ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम – व्हेरेव्ह, किर्गिओस यांचेही विजय, केर्बर पराभूत
वृत्तसंस्था/ मेलबर्न
2021 च्या टेनिस हंगामातील पहिल्या ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेला सोमवारपासून येथे प्रारंभ झाला. सर्बियाचा टॉप सीडेड आणि विद्यमान विजेता नोव्हॅक जोकोविच, ऑस्ट्रीयाचा डॉम्निक थिएम, जर्मनीचा ऍलेक्झांडर व्हेरेव्ह आणि ऑस्ट्रेलियाचा निक किर्गिओस, स्टॅन वावरिंका यांनी पुरूष एकेरीत विजयी सलामी दिली. फ्रान्सचा चार्डी, कझाकस्तानचा कुकूश्किन, अमेरिकेचा गिरॉन यांचे आव्हान संपुष्टात आले. महिला एकेरीत कॅनडाच्या बियान्का अँड्रेस्क्यूने तसेच माजी टॉप सीडेड सेरेना विल्यम्स, जपानची ओसाका यांनी विजयी सलामी दिली. जर्मनीच्या केर्बरचे आव्हान मात्र पहिल्याच फेरीत समाप्त झाले.
पुरूष एकेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात सर्बियाच्या जोकोविचने फ्रान्सच्या जेरेमी चार्डीचा 6-3, 6-1, 6-2 असा पराभव करत विजयी सलामी दिली. ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेतील जोकोविचचा हा 297 वा विजय आहे. मेलबोर्नमध्ये अलिकडच्या कालावधीत जोकोविचने 17 पैकी आठ प्रमुख स्पर्धा जिंकल्या आहेत. दुसऱया एका सामन्यात ऑस्ट्रीयाच्या थिएमने कझाकस्तानच्या कुकूश्किनवर 7-6 (7-2), 6-2, 6-3 अशी मात करत दुसरी फेरी गाठली. या सामन्यात तृतीय मानांकित थिएमने पहिल्या सेटमध्ये दोनवेळा कुकूश्किनची सर्व्हिस तोडली. अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम विजेता थिएमचा दुसऱया फेरीतील सामना कोपफेर किंवा डिलेन यांच्यातील विजयी खेळाडूबरोबर होईल. जर्मनीच्या ऍलेक्झांडर व्हेरेव्हने विजयी सलामी देताना अमेरिकेच्या मार्कोस गिरॉनचा 6-7 (8-10), 7-6 (7-5), 6-3, 6-2 असा पराभव केला. ऑस्ट्रेलियाच्या नीक किर्गिओसने दुसऱया फेरीत प्रवेश मिळविताना पोर्तुगालच्या सिल्वाचे आव्हान 6-4, 6-4, 6-4 असे संपुष्टात आणले. दुसऱया फेरीत किर्गिओसचा सामना फ्रान्सच्या हंबर्टबरोबर होणार आहे. स्वित्झर्लंडच्या 35 वर्षीय वावरिंकाने विजयी सलामी देताना पोर्तुगालच्या सोसाचा 6-3, 6-2, 6-4 असा पराभव केला. अन्य एका सामन्यात फ्रान्सच्या बेनोई पेअरला रोमांचक लढतीत इगोर गेरासिमोव्हकडून 2-6, 6-2, 6-7 (5-7), 5-7 असा पराभव स्वीकारावा लागला. स्पर्धेआधी क्वारंटाईन कालावधीत आयोजकांनी दिलेल्या वागणुकीवर त्याने संताप व्यक्त केला आणि यामुळेच आपल्याला पहिल्या फेरीत पराभव स्वीकारावा लागल्याचा आरोप त्याने केला.
शॅपोव्हॅलोव्ह-सिनर यांची झुंजार लढत
कॅनडाचा 11 वा मानांकित 21 वर्षीय डेनिस शॅपोव्हॅलोव्ह व इटलीचा 19 वर्षीय यानिक सिनर यांच्यातील झुंज अतिशय रंगतदार ठरली.. तब्बल पाच सेट्स रंगलेला हा भविष्यातील खेळाडूंचा सामना शॅपोव्हॅलोव्हने 3-6, 6-3, 6-2, 4-6, 6-4 असा जिंकून दुसरी फेरी गाठली. शॅपोव्हॅलोव्हने सामन्यानंतर शॅपोव्हॅलोव्हने सिनरच्या खेळाचे कौतुक केले. रविवारीच सिनरने एटीपी अजिंक्यपद मिळवित दोन एटीपी स्पर्धा जिंकणारा 2006 नंतरचा पहिला टेनिसपटू होण्याचा मान मिळविला होता. 2006 मध्ये जोकोविचने हा पराक्रम केला होता.
महिला एकेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात जपानच्या तृतीय मानांकित नाओमी ओसाकाने रशियाच्या पॅव्हेलचेंकोव्हाचा 6-1, 6-2 अशा सरळ सेट्समध्ये केवळ 68 मिनिटात फडशा पाडला. जर्मनीच्या नवोदित बर्नार्ड पेराने आपल्याच देशाच्या तीनवेळा ग्रॅण्ड स्लॅम जेतेपद मिळविणाऱया अँजेलिक केर्बरला पराभवाचा धक्का दिला. या सामन्यात पेराने केर्बरवर 6-0, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये मात करत विजयी सलामी दिली. अमेरिकेच्या अनुभवी आणि माजी टॉप सीडेड सेरेना विल्यम्सने 24 वे ग्रॅण्ड स्लॅम जेतेपद मिळविण्याच्या आपल्या मोहिमेला प्रारंभ करताना सोमवारी झालेल्या पहिल्या फेरीतील सामन्यात जर्मनीच्या लॉरा सिगमंडचा 6-1, 6-1 अशा सरळ सेट्समध्ये केवळ 56 मानिटात एकतर्फी पराभव करत विजयी सलामी दिली. सेरेनाने आतापर्यंत सातवेळा ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धा जिंकली आहे. कॅनडाच्या बियान्का अँड्रेस्क्यूने तब्बल 15 महिन्यानंतर आपला पहिला विजय नोंदविताना या स्पर्धेतील पहिल्या फेरीतील सामन्यात रूमानियाच्या मिचेला बुझामेस्क्यूचा 6-2, 4-6, 6-3 तसेच तैवानच्या वेईने बल्गेरियाच्या पिरोनकोव्हाचा 7-5, 6-2 असा पराभव करत दुसऱया फेरीत प्रवेश मिळविला.