जेतेपदाच्या लढतीत रशियाच्या मेदवेदेव्हवर तीन सेट्समध्ये मात
वृत्तसंस्था/ मेलबर्न
सर्बियाचा अग्रमानांकित नोव्हॅक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅमवरील मक्तेदारी कायम ठेवताना नवव्यांदा ही स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला. रविवारी झालेल्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत जोकोविचने रशियाच्या डॅनील मेदवेदेव्हचा पराभव केला.
जोकोविचने मेदवेदेव्हवर 7-5, 6-2, 6-2 अशी सुमारे दोन तासांत मात करून मेलबर्न पार्कवर सलग तिसऱयांदा जेतेपद पटकावले. त्याचे हे कारकिर्दीतील एकूण 18 वे ग्रँडस्लॅम जेतेपद असून रॉजर फेडरर व राफेल नदाल यांना गाठण्यासाठी त्याला आणखी दोन अजिंक्यपदाची गरज आहे. त्याने विम्बल्डनमध्ये पाच, अमेरिकन ओपनमध्ये तीन आणि पेंच ओपनमध्ये एकदा जेतेपद मिळविलेले आहे. फेडरर, नदाल यांनी प्रत्येकी 20 ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे पटकावली आहेत.
जोकोविचने या सामन्यात अप्रतिम सर्व्हिस, जोरदार परतीचे फटके आणि बेसलाईनवरील उत्तम खेळ यांच्या बळावर 11 ते 13 वे गेम्स त्याने सलग जिंकून मेदवेदेव्हला नमविले. मेदवेदेव्ह मात्र ग्रँडस्लॅमची अंतिम फेरी गाठूनही जेतेपद मिळविता न आल्याने खूप निराश झाल्याचे दिसून आले. या हार्डकोर्टवरील स्पर्धेवर जोकोविचने मक्तेदारीच निर्माण केली असून त्यावरील उपांत्य व अंतिम सामन्यांचे त्याचे रेकॉर्ड 18-0 असे झाले आहे. 9 वेळा त्याने अंतिम फेरी गाठली आणि प्रत्येकी वेळी तो यशस्वी ठरला आहे. जोकोविचने गेल्या दहापैकी सहा ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या असून मार्चच्या मध्यापर्यंत तरी त्याने आपले अग्रस्थान निश्चित केले आहे. त्यामुळे त्याला 311 आठवडे अग्रस्थानावर राहता येणार असून फेडररचा विक्रम त्याला मागे टाकता येणार आहे.
चौथ्या मानांकित मेदवेदेव्हची ग्रँडस्लॅमची अंतिम फेरी गाठण्याची ही दुसरी वेळ होती. यापूर्वी त्याने 2019 च्या अमेरिकन ओपन स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. पण त्यावेळी राफेल नदालने जेतेपद पटकावल्याने तेव्हाही त्याला उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले होते. जोकोविचकडून पराभूत झाल्याने त्याची सलग 20 सामन्यांची विजयी मालिकाही खंडित झाली आहे. त्याने गेल्या 12 सामन्यात टॉप टेनमधील खेळाडूंवर विजय मिळविले आहेत. जोकोविचलाही त्याने याआधी हरविलेले आहे. मात्र यावेळी त्याला ही कामगिरी करता आली नाही. येथील सामन्यासाठी 50 टक्के प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली होती आणि बहुतेकांची जोकोविचलाच पसंती होती. तिसऱया फेरीत त्याच्या पोटाचे स्नायू दुखावले होते. पण उपांत्य फेरीपर्यंत तो पूर्ण फिट झाला होता. यामुळे त्याला या स्पर्धेतील पहिल्या सहा सामन्यात पाच सेट्स गमवावे लागले. इतके सेट्स गमविण्याची ग्रँडस्लॅममधील त्याची ही पहिलीच वेळ होती. याशिवाय ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेरीत खेळण्याची त्याची ही एकूण 28 वी वेळ होती. नदालनेही 28 वेळा अंतिम फेरी गाठली होती तर फेडररने सर्वाधिक 31 वेळा ग्रँडस्लॅमची अंतिम फेरी गाठली होती.