वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
अग्रमानांकित नोव्हॅक जोकोविचने टेनीस सँडग्रेनचा पराभव करून वेस्टर्न अँड सदर्न ओपन एटीपी 1000 मास्टर्स टेनिस स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली तर मिलोस रेऑनिकनेही ब्रिटनच्या अँडी मरेवर सहज विजय मिळवित पुढील फेरीत स्थान मिळविले.
जोकोविचने सँडगेनवर 6-2, 6-4 मात केली. त्याची पुढील लढत जर्मनीच्या जॅन लेनार्ड स्ट्रूफशी होईल. जॅन लेनार्डने डेव्हिड गॉफिनचा 6-4, 3-6, 6-4 असा पराभव केला. आधीच्या फेरीत अँडी मरेने पाचव्या मानांकित अलेक्झांडर व्हेरेव्हचा पराभव करताना जबरदस्त खेळ केला होता. पण तो जोम रेऑनिकविरुद्ध त्याला दाखविता आला नाही. रेऑनिकने 10 बिनतोड सर्व्हिस करीत मरेला 6-2, 6-2 असे नमवून उपांत्यपूर्व फेरी गाठली. या सामन्यात पावसाचाही व्यत्यय आला होता. 2014 नंतर रेऑनिकने मरेवर पहिल्यांदाच विजय मिळविला आहे.
विद्यमान विजेत्या डॅनील मेदवेदेव्हने पात्रता फेरीतून आलेल्या ऍलाझ बेडेनेचा 6-3, 6-3 असा सहज पराभव केला. अन्य सामन्यात स्टिफानोस सित्सिपसने जॉन इस्नेरचा 7-6 (7-2), 7-6 (7-4), रेईली ओपेल्काने सहाव्या मानांकित मॅटेव बेरेटिनीचा 6-3, 7-6 (7-4) असा पराभव केला. रॉबर्टो बॉटिस्टा ऍगट व फिलिप क्रायनोविक यांनीही आगेकूच केली आहे. कोव्हिड 19 च्या प्रादुर्भावामुळे ही स्पर्धा सिनसिनॅटीऐवजी न्यूयॉर्कमधील फ्लशिंग मेडोज येथे प्रेक्षकांविना खेळविली जात आहे.