अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम – जर्मनीचा अलेक्झांडर व्हेरेव्ह, जपानचा निशिकोरी, इटलीचा बेरेटिनी यांचीही विजयी सलामी
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
जागतिक अग्रमानांकित सर्बियाच्या नोव्हॅक जोकोविचने विक्रमी 21 व्या ग्रँडस्लॅम जेतेपदाच्या दिशेने पहिले पाऊल टाकताना अमेरिकन ओपन स्पर्धेची दुसरी फेरी गाठली. याशिवाय जर्मनीचा अलेक्झांडर व्हेरेव्ह, कॅनडाचा डेनिस शापोव्हॅलोव्ह, जपानचा निशिकोरी, ऑस्ट्रेलियाची ऍश्ले बार्टी, माजी विजेती बियान्का अँड्रीस्क्यू यांनीही विजय मिळवित दुसऱया फेरीत स्थान मिळविले. स्पेनचा पाब्लो बुस्टा तसेच सॅम क्वेरी यांचे आव्हान मात्र संपुष्टात आले.
34 वर्षीय जोकोविचने पात्रता फेरीतून आलेल्या डेन्मार्कच्या 18 वर्षीय होल्गर रुनेवर 6-1, 6-7 (5-7), 6-2, 6-1 अशी मात केली. सव्वादोन तास ही लढत चालली होती. विजय मिळविला असला तरी जोकोविच आपल्या खेळावर समाधानी नव्हता. ‘माझा हा सर्वोत्तम खेळ नव्हता आणि त्याने दुसऱया सेटमध्ये तर छानच प्रदर्शन केले. या सेटमध्ये माझी सर्व्हिसही योग्यप्रकारे झाली नाही,’ असे तो म्हणाला. गेल्या बारापैकी आठ ग्रँडस्लॅम जिंकणाऱया जोकोविचची पुढील लढत हॉलंडच्या टॅलन ग्रीकस्पूरविरुद्ध होईल. या खेळाडूबद्दल जोकोविचला फारशी माहिती नसल्याचे त्याने सांगितले. कॅलेंडर वर्षात चारही ग्रँडस्लॅम पटकावण्यासाठी त्याला येथील स्पर्धा जिंकावी लागणार आहे.
व्हेरेव्हचा क्वेरीला धक्का
टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकलेल्या चौथ्या मानांकित अलेक्झांडर व्हेरेव्हने सलग 12 वा सामना जिंकताना अमेरिकेच्या सॅम क्वेरीचा 6-4, 7-5, 6-2 असा पराभव केला. जोकोविचच्या मार्गातील हा एक मुख्य अडथळा असल्याचे मानले जात आहे. गेल्या वर्षी त्याने या स्पर्धेचे उपविजेतेपद मिळविले होते. त्याने येथील सामन्यात 18 बिनतोड सर्व्हिस केल्या आणि त्याला एकाही ब्रेकपॉईंटला सामोरे जावे लागले नाही. त्याची पुढील लढत स्पेनच्या अल्बर्ट रामोस व्हिनोलसविरुद्ध होणार आहे आणि अपेक्षेप्रमाणे निकाल लागत गेल्यास कदाचित उपांत्य फेरीत जोकोविचशी त्याचा मुकाबला होऊ शकेल. अमेरिकेच्या पात्रता फेरीतून आलेल्या मॅक्झिम क्रेसीने 44 बिनतोड सर्व्हिस करीत आणि चार मॅचपॉईंट्स वाचवत स्पेनच्या नवव्या मानांकित पाब्लो कॅरेनो बुस्टाला 5-7, 4-6, 6-1, 6-4, 7-6 (9-7) असा पराभवाचा धक्का दिला.
निशिकोरी, डेनिस विजयी
अन्य एका सामन्यात जपानच्या 56 व्या मानांकित केई निशिकोरीने इटलीच्या साल्वातोर कारुसोवर 6-1, 6-1, 5-7, 6-3 अशी मात केली. त्याची पुढील लढत अमेरिकेच्या मॅकेन्झी मॅकडोनाल्डशी होणार आहे. तिसऱया फेरीत त्याचा सामना जोकोविचशी पडण्याची शक्यता आहे. विम्बल्डन उपविजेत्या मॅटेव बेरेटिनीनेही दुसरी फेरी गाठताना फ्रान्सच्या जेरेमी चार्डीवर 7-6 (7-5), 7-6 (9-7), 6-3 अशी मात केली. कॅनडाच्या सातव्या मानांकित डेनिस शापोव्हॅलोव्हने अर्जेन्टिनाच्या फेडरिको डेल्बोनिसचा 6-2, 6-2, 6-3 असा सहज पराभव करताना 14 बिनतोड सर्व्हिस केल्या.
महिलांमध्ये जागतिक अग्रमानांकित ऑस्ट्रेलियाच्या ऍश्ले बार्टीने रशियाच्या व्हेरा व्होनारेव्हाचा 6-1, 7-6 (9-7) असा पराभव करून दुसरी फेरी गाठली. याआधी तिने विम्बल्डन स्पर्धा जिंकली असल्याने सलग दुसरी ग्रँडस्लॅम जिंकण्याचा तिचा इरादा आहे. तिची पुढील लढत डेन्मार्कच्या क्लारा टॉसनशी होणार आहे. 2019 मध्ये ही स्पर्धा जिंकलेल्या सहाव्या मानांकित बियान्का अँड्रीस्क्यूने पोटदुखी व स्विस प्रतिस्पर्धी व्हिक्टोरिया गोलुबिकचा कडवा प्रतिकार मोडून काढत 7-5, 4-6, 7-5 असा विजय मिळविला. 2019 नंतर तिने प्रथमच या स्पर्धेत पुनरागमन केले आहे. दुसऱया फेरीत तिचा मुकाबला अमेरिकेच्या लॉरेन डेव्हिसशी होणार आहे.